सुदर्शन मंडले
ग्रामीण प्रतिनिधी आळेफाटा
आळेफाटा : सुरक्षित प्रवासासाठी प्रत्येक वाहनचालकाने वाहतूक नियम पाळणे गरजेचे आहे. १ जानेवारी २०२३ ते २५ डिसेंबर २०२३ या कालवधीत वाहतूक नियमांना पाठ दाखविणाऱ्या ७ हजार ४३७ वाहन चालकांवर मोटार वाहन अधिनियमाच्या विविध कलमान्वये कारवाई करून त्यांच्याकडून तब्बल ३८.३३ लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. सदर कारवाई आळेफाटा वाहतूक पोलिसांनी केली असून त्यांच्याकडून सध्या हेल्मेट सक्तीकरिता विशेष प्रयत्न केले जात आहेत. या कारवाईत चारचाकी वाहनात सीटबेल्ट न वापरणाऱ्या चालकांनी सर्वात जास्त संख्या आहे.
वर्षभरात मालवाहतूक वाहनात प्रवाशांची वाहतूक करताना आढळून आल्याने ५०४ वाहनचालकांवर कारवाई करून त्यांच्याकडून ३ लाख १६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ट्रिपल सिट प्रवास करताना आढळून आल्याने ८५६ वाहनचालकांकडून ८५ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त चारचाकी वाहनात सीटबेल्ट न वापरणाऱ्या २ हजार ५३६ वाहन चालकांकडून ५ लाख ५० हजार रुपये, ५३६ वाहनचालकांनी त्यांची वाहने धोकादायक रित्या रोडवर उभी केल्याने त्यांना ३२ हजार ६०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. ब्लॅक काच असणाऱ्या १४१ वाहनांवर कारवाई करत त्यांच्याकडून १ लाख ३२ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. लायसन्स जवळ न बाळगनाऱ्या ८७८ वाहनचालकांकडून ४ लाख ७५ हजार दंड वसूल करण्यात आला आहे. मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्या १८० वाहन चालकांविरुद्ध तर धोकादायक रित्या रोडवर वाहन लावणाऱ्यावर २०० गुन्हे दाखल केले आहे. आळेफाटा पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलिसांनी ७ हजार ४३७ वाहन चालकांना ३८.३३ लाखांचा दंड वसूल केला आहे. ३१ डिसेंबरच्या पूर्वसंध्येला आळेफाटा पोलिस ठाण्याअंतर्गत वाहतूक पोलिसांची कारवाई सुरु राहणार आहे. ड्रंक ॲण्ड ड्राईव्हच्या कारवाईवर भर दिला जाणार आहे. मद्यपान करून कोणीही वाहन चालवू नये. नियमांचे पालन करून सर्वांनी नववर्षाचे स्वागत करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी केले आहे.