माबुद खान
तालुका प्रतिनिधी जिंतूर
जिंतूर: शिवसेना तालुकाप्रमुख ॲड. सुनिल बुधवंत यांनी केली दोन दिवसीय पाहणी.रविवारच्या (26 नोव्हेंबर) मध्यरात्री पडलेल्या अवकाळी पावसाचा फटका जिंतूर तालुक्यातील बहुतांश भागाला बसला आहे. या पावसामुळे शेतीपिकांचं नुकसान झालं आहे. झालेल्या नुकसानीची पाहणी शिवसेना तालुकाप्रमुख ॲड. सुनिल बुधवंत यांनी सोमवार (27 नोव्हेंबर) व मंगळवार (28 नोव्हेंबर) या दोन दिवसात केली. जिंतूर तालुक्यात रविवारच्या मध्यरात्रीपासूनच मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे कापूस पीक भिजलं असून तूर, हरभरा भाजीपाला ही पिकं भूईसपाट झाली आहेत. अतिपावसामुळे शेतातील कापसाची बोंडं खाली गळून पडली आहेत, वेचणीला आलेल्या कापसाची पावसामुळे दाणादाण उडाली आहे. रब्बी हंगामातील ज्वारी, गहू पिकांनाही पावसाचा फटका बसला आहे. त्याचबरोबर वीज पडून पशुधनाचं सुद्धा नुकसान झालं आहे.तालुक्यातील कर्परा नदीला आलेल्या पुरामुळे पुराचे पाणी तालुक्यातील अनेक गावांमध्ये शिरलं आहे. तसेच इतर नदी नाल्यांना आलेल्या पुरामुळे शहरात सुद्धा पाणी जमा झाले होते. लोकांच्या घरात तसेच व्यापाऱ्यांच्या दुकानात सुद्धा पाणी शिरल्याने वस्तूंचे तथा मालाचे नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीचा आढावा शासन तथा प्रशासनाकडे पोहोचवून देऊ जेणेकरून महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे साहेब लवकरच मदत करतील असा विश्वास ॲड. बुधवंत यांनी व्यक्त केला.