कैलास शेंडे
ग्रामीण प्रतिनिधी बोरद
बोरद: तळोदा तालुक्यातील मोड, बोरद, मोहिदा परीसरात असलेले ऊस तोडणीस आलेल्या मजूर वर्गाचे मोठ्या प्रमाणावर हाल होतांना दिसून येत आहे. साधारण दोन आठवड्यापासून ऊस तोडणीला सुरूवात झाली आहे. जिल्ह्यातील साखर कारखाने, खांडसरी व शेतकरी मजूर टंचाईमुळे मेटाकुटीला आले असतांना आता अवकाळीचे संकट हात जोडून उभे ठाकले आहे. रविवार रोजी मोड, बोरद व मोहिदा परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान परिसरात सकाळपासूनच ढगाळ वातावरण पसरले होते. दुपार नंतर अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने ऊस तोडणी मजुरांचे चांगलेच हाल झाले होते. वादळी वाऱ्यामुळे शेतात टाकलेले अनेकांचे तंबु उडून इतरत्र पडले त्यामुळे ऊस तोडणी करणारे मजुरांचा संसार उघड्यावर आला. तसेच त्यांनी स्वयंपाक बनविण्यासाठी गोळा केलेले सरपन देखील ओले चिंब झाले. तसेच धान्य देखील ओले झाले. त्यामुळे त्यांना जेवण बनविणे देखील कठीण झाले आहे. दरम्यान मोहिदा, बोरद, मोरवड येथे ऊस तोडणी करणाऱ्या मजुरांना ग्रामस्थांनी माणुसकी दाखवत अवकाळी बाधित २०० ते २५० मजुरांना जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. जे प्रशासन, खांडसरी व साखर कारखान्यांना जमले नाही ते ग्रामस्थांनी केले आहे. त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.यावेळी मोहिदा येथील उपसरपंच आनंद चौधरी, अंबालाल पाटील, भरत चव्हाण, दिनेश चव्हाण, प्रकाश पोटे, संजय चव्हाण, पप्पू पाटील, सदमा ठाकरे, भास्कर गिरासे गावातील तरुण, नरेंद्र चव्हाण, राजेंद्र तनपूरे , जगदिश पाटील ई. ग्रामस्थांनी मेहनत घेतली. तसेच मोरवड येथे रणजित चौधरी व ग्रामस्थांनी देखील माणुसकी दाखवत ऊस तोडणी मजुरांना जेवणाची व्यवस्था केली होती.


