अयनुद्दीन सोलंकी
तालुका प्रतिनिधी, घाटंजी
घाटंजी, 17 नोव्हेंबर :- घाटंजी तालुक्यात एकुण 104 कंट्रोल डिलर असुन अंत्योदय कुपन 8 हजार 703, प्राधान्य कुपन 22 हजार 485 व एपीएल – शेतकरी कुपन 931 असे एकुण 32 हजार 119 कुपन धारक आहे. मात्र, दिपावली निमित्त आनंदाचा शिधा जे 100 रुपयात देण्यात आला त्यावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सह अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री छगन भुजबळ यांच्या तर्फे हार्दिक शुभेच्छा असा मजकूर लिहून केवळ 100 रुपयात साखर 1 किलो, खाद्य तेल 1 लिटर, चनाडाळ अर्धा कीलोग्रॅम, रवा अर्धा किलोग्रॅम, मैदा अर्धा किलोग्रॅम, पोहे अर्धा किलोग्रॅम असा शिधाजिन्नस संच लिहलेले होते. मात्र, शासन वा जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या कार्यालयाकडुन दिपावली निमित्त आनंदाचा शिधा 90 टक्केच किट घाटंजी तालुक्यातील कंट्रोल डिलर मार्फत वाटत करण्यात आले. त्यामुळे कंट्रोल डिलर व कुपन धारकांत वाद विवाद होतांना दिसत आहे. त्यातच घाटंजी तालुक्यातील कंट्रोल डिलर यांनी आनंदाचा शिधा किटचे वाटप करण्यात आले नसल्याचा आरोप कुपन धारकांनी केला आहे. वास्तविक पाहता, घाटंजी तालुक्यात 32 हजार 119 कुपन धारक असुन त्यापैकी 90 टक्केच किटचे वाटप करण्यात आले, हे येथे उल्लेखनीय. विशेष म्हणजे पोळा सना निमित्त शासन व जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाकडुन 95 टक्के आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला होता.
घाटंजी तहसील कार्यालयाचे तहसीलदार विजय साळवे यांची प्रतिक्रिया घेतली असता, दिवाळी निमित्त वाटत करण्यात आलेला आनंदाचा शिधा किती टक्के वाटप करण्यात आला. या बाबत मला माहिती नाही. परंतु, पुरवठा विभागातील निरिक्षण अधिकारी यांना विचारुन सांगतो, असे तहसीलदार साळवे यांनी सांगितले.
पुरवठा विभागातील निरिक्षण अधिकारी किरण मस्के यांची प्रतिक्रिया घेतली असता, घाटंजी तालुक्यात 32 हजार 119 कुपन धारकांसाठी दिपावली निमित्त 100 टक्के आनंदाचा शिधा किटची मागणी शासन वा जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाकडुन मागणी करण्यात आली. परंतु, 29 हजार 276 कुपन धारकांना म्हणजेच 90 टक्के किट घाटंजी तालुक्यात प्राप्त झाल्याची माहिती निरिक्षण अधिकारी मस्के यांनी दिली.
दरम्यान, जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार यांचेशी संपर्क केला असता, दिपावली निमित्त आनंदाचा शिधा मिळावा म्हणून यवतमाळ जिल्ह्यातून शासनाकडे 5 लाख 62 हजार कुपन धारकांचे नांव नोंदवले. मात्र, प्रत्यक्षात 5 लाख 32 हजार कुपन धारकांना शासनाकडून आनंदाचा शिधा वाटप किट प्राप्त झाले. विशेष म्हणजे या पुर्वी तीन वेळा आनंदाचा शिधा वाटप करण्यात आला होता. मात्र, तिन्ही वेळा किट शिल्लक राहिले होते. त्यामुळेच या वेळी शासनाने 90 टक्केच किट देण्याचा निर्णय घेतला असावा, असे जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार यांनी सांगितले.