मकरंद जाधव
तालुका प्रतिनिधी श्रीवर्धन
आपल्या संस्कृतीत स्वार्थत्याग करून गरजूंना केलेलं दान सर्वश्रेष्ठ मानलं जातं.मात्र एक दान असंही आहे,जे मृत्यूनंतरही करता येतं.ते म्हणजे नेत्रदान! अनंताच्या पलीकडे जाऊनही अस्तित्व करावं,तुमच्या डोळ्यातूनही कुणी तरी जग पहावं’ या उक्तीला सत्यात उतरवित श्रीवर्धन मधील भैरवनाथ पाखाडीतील रहिवासी अनंत दवटे यांनी मरणोत्तर नेत्रदान करुन समाजापुढे नवा आदर्श ठेवला आहे.अनंत दवटे यांचं वयाच्या पंचाहत्तराव्या वर्षी ठाणे येथे १५ नोव्हेंबर रोजी प्रदिर्घ आजाराने निधन झालं.ठाण्यामधे पुरवठा विभागात शिधा वाटप आधिकारी म्हणुन कार्यरत असलेले अनंत दवटे सन २००४ साली निवृत्त झाले. आपल्या आजारपणाच्या काही वर्षं आधी मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प त्यांनी केला होता.यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता देखील केली होती.मरणोत्तर कोणतही दशक्रिया, किंवा बाराव्याचा विधी न करता वाचलेली रक्कम अनाथ आश्रमाला दान करण्याची सूचना आपल्या मुलांना देतानाच.तिसऱ्या दिवशी तिर्थक्षेत्र हरेश्वर येथे अस्थी विसर्जन करून सुतकातून मुक्त होऊन दैनंदिन व्यवहाराला सुरुवात करण्यास आपल्या कुटुंबीयांना सांगितलं होतं.त्याचबरोबर पत्नीच्या आधी मृत्यू आल्यास तिचं सौभाग्यलेणं न उतरवता तिला सन्मानपूर्वक वागणूक द्यावी ही इच्छा व्यक्त केली होती.हे केवळ तोंडी सूचना न देता लिखित इच्छा पत्र वयाच्या ७५ व्या वर्षी जवळच्या गणगोतासमोर त्यांनी वाचून दाखवलं होतं.त्यांच्या या पुरोगामी संकल्पाला कृतिशील रुप देत कुटूंबियांनी त्यांचं नेत्रदान करण्याची हिम्मत दाखवली.तसेच मुलाबरोबर मुलीनेही वडिलांना खांदा देत अग्नी संस्कार केले.वडिलांच्या पुरोगामी विचारांची बांधिलकी जपणारे दवटे कुटुंबिय सर्व समाजासाठी अनुकरणीय आदर्श ठरले आहेत हे निश्चित.यावेळी त्यांची पत्नी अजिता,मुलगा अनिकेत,सुन अक्षता,नातवंडे ऋजुला,जेसिका, साईश यांनी धीराने या प्रसंगाला तोंड दिलं.त्यांच्या या आगळ्या वेगळ्या संकल्पाला मुली अपर्णा, आरती,जावई,समस्त दवटे परिवार आणि मामांकडील पडवळ कुटुंबीयांचा भक्कम पाठिंबा लाभला. मरणोत्तर नेत्रदानाचा निर्णय कठोर असला तरी ती एक सामाजिक बांधिलकी आहे.याबाबत प्रत्येकाने आत्मचिंतन करुन सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करावा.असं आवाहन त्यांची मुलगी अंधश्रध्दा निर्मुलन समिती राज्य कार्यवाह आरती नाईक यांनी केलं.दवटे कुटुंबियांच्या या धाडसी निर्णयामुळे एका दृष्टीहिनास दृष्टी मिळून त्याचं अंधकारमय जीवन प्रकाशमान होणार आहे.कै.अनंत दवटे यांचा मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प त्यांच्या कुटुंबियांनी पुर्ण करीत समाजापुढे नवा आदर्श निर्माण केला आहे.











