अयनुद्दीन सोलंकी
तालुका प्रतिनिधी, घाटंजी
घाटंजी, 29 ऑक्टोंबर :- घाटंजी तालुक्यातील पंगडी येथील ग्राम सेविका वर्षाराणी कोलते हिचा पंगडी येथील ग्रामपंचायचा प्रभार काढुन घेतला आहे. तर ग्राम सेविका कोलते यांच्या जागेवर संतोष मुळे यांची बदली करण्यात आली आहे. सदर आदेश घाटंजी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी महेश ढोले यांनी काढला आहे. ग्रामपंचायत पंगडी येथील ग्रामपंचायतचा कारभार पुर्वी पासुनच वादग्रस्त असुन नव्या तक्रारीने त्यात आणखीनच भर पडली होती. विशेष म्हणजे ग्रामपंचायत सचिव कोलते हे सरपंच यांना विश्वासात न घेता उपसरपंच कदम यांचे सोबत हात मिळवणी करुन सरपंच यमुना मेश्राम हिला अपमानित करत असल्याचा आरोप लेखी तक्रारीतुन करण्यात आला होता. तसेच सचिव हे सरपंच यांना मागितलेली कोणतीही माहिती देत नसुन तुमची मला काहीही आवश्यकता नाही, असे उद्धट उत्तर देत असल्याचा आरोप सरपंच यमुना मेश्राम हिने केला होता. पंगडी ग्रामपंचायत कार्यालय अंतर्गत ग्रामपंचायत सचिव वर्षाराणी कोलते यांनी जलजिवन मिशनची कामें पंगडी येथील उपसरपंच कदम यांना दिले होते तसेच अनेक कामें अर्धवट व अपुर्ण होते, असा आरोप करण्यात आला. तसेच पंगडी येथील ग्रामपंचायत ग्रामसभेची परवानगी न घेता 15 व्या वित्त आयोगाचा निधी वापरला होता, असा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे ग्रामपंचायत सचिव व उपसरपंच कदम हे मनमानी कारभार करत असल्याचा आरोप पंगडी येथील सामाजिक कार्यकर्ते गजानन चिंचुलकर व मदन मुनेश्वर आदींनी केला होता. पंगडी येथील जल जिवन मिशन पाईप लाईन फोडून कनेक्शन जोडण्यात आले असून गरज नसतांना 15 व्या वित्त आयोगाचा निधी वापरण्यात आल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला होता. सरपंच यमुना मेश्राम हिला विश्वासात न घेता सचिव यांनी ग्रामपंचायतची नोटीस पुस्तिका परस्पर शिपायाकडुन घेऊन आपल्या ताब्यात घेतले होते. वास्तविक पाहता, ग्रामपंचायतचे सर्व दफ्तर हे नियमानुसार ग्रामपंचायत कार्यालयात ठेवणे आवश्यक व बंधनकारक असतांना घाटंजीचे गट विकास अधिकारी महेश ढोले यांनी सदर नोटीस बुक मागितल्याचे सचिव कोलते यांनी सरपंच यांना सांगितले होते. दरम्यान, नियमानुसार गट विकास अधिकारी यांना ग्रामपंचायत नोटीस पुस्तिकेचे अजिबात कोणतेही काम नसते. एकंदरीत पंगडी येथील ग्रामपंचायत सचिव वर्षाराणी कोलते यांची तात्काळ बदली करुन त्या ठिकाणी नविन ग्रामसेवक देण्याची मागणी करण्यात आली होती. निवेदनावर पंगडी ग्रामपंचायत सरपंच यमुना हनुमान मेश्राम, निळकंठ भोयर, मदन मुनेश्वर, गजानन चिंचुळकर, संजय माळोदे, गोविंदराव भोयर, अतुल भोयर व इतर गावकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या होत्या. घाटंजी पंचायत समितीचे पंचायत विस्तार अधिकारी सखाराम ईसाळकर यांची प्रतिक्रिया घेतली असता, पंगडी गावकऱ्यांच्या लेखी तक्रारी वरुन ग्राम सेविका वर्षाराणी कोलते हिचा पंगडी येथील प्रभार काढण्यात आला आहे. ग्राम सेविका वर्षाराणी कोलते यांच्या जागेवर दहेगांव येथील ग्रामसेवक संतोष मुळे यांची बदली पंगडी येथे करण्यात आली आहे, असा आदेश घाटंजी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी महेश ढोले यांनी काढला आहे.