अयनुद्दीन सोलंकी
तालुका प्रतिनिधी, घाटंजी
घाटंजी – घाटंजी तालुक्यातील टिटवी येथील ग्रामसेवक बापु खंडू पाटील (53) ह. मु. घाटंजी, ग्राम रोजगार सेवक विवेकानंद प्रभाकर देशमुख (48) व कंत्राटी कनिष्ठ अभियंता जया त्र्येबंक ढोके (43) या तिन्ही आरोपींना घाटंजी येथील दिवाणी व फौजदारी न्यायाधिश तथा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी ए. ए. उत्पात (Civil Judge Jr. Dn. & JMFC A. A. UTPAT) यांच्या न्यायालयाने भादंवि कलम 420, 34 अंतर्गत दोषी आढळल्याने शिक्षा ठोठावली आहे. शासनातर्फे सहाय्यक सरकारी वकील ॲड. एन. आर. गायकवाड यांनी सरकारी पक्षाची बाजू मांडली.घाटंजी पंचायत समिती अंतर्गत टिटवी येथे राबविण्यात येत असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत टिटवी येथील पंचफुला किसन आत्राम (Panchfula Kisan Atram) हिच्या वैयक्तिक सिंचन विहीरीच्या कामात झालेल्या आर्थिक अनियमितता व अपहार झाल्याचा आरोप झाला होता. सदर प्रकरणात जिल्हा परिषदेचे बांधकाम विभागाचे अभियंता, बाल कल्याण विभागाचे उप कार्यकारी अधिकारी यांनी टिटवी येथील सिंचन विहीर प्रकरणात प्रकरणात सखोल चौकशी करून 26 जुन 2012 रोजी यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे चौकशी अहवाल सादर केला. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशावरून अपहारातील रक्कम 76 हजार 950 रुपये ग्रामसेवक व इतरांकडून वसुल करण्याचे आदेश घाटंजी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी अजय राठोड (BDO AJAY RATHOD) यांना दिले. तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशावरून घाटंजी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी अजय राठोड यांनी पारवा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली. या वरुन आरोपी बापु पाटील, विवेकानंद तोडकरी व कंत्राटी कनिष्ठ अभियंता जया ढोके आदीं विरुद्ध पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक पंजाब वंजारी (API PANJAB WANJARI) यांनी भादंवि कलम 420, 409, 467, 468 व 34 अंतर्गत गुन्हे दाखल करुन सदर प्रकरण तपासात घेतला. पारवा पोलीसांनी तपास करुन सदर प्रकरणाचे दोषारोप पत्र घाटंजी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात दाखल केले.
सदर प्रकरणात सरकारी पक्षातर्फे एकुण 12 साक्षदार तपासण्यात आले. आरोपी ग्रामसेवक बापु पाटील, ग्राम रोजगार सेवक विवेकानंद तोडकरी व कंत्राटी कनिष्ठ अभियंता जया ढोके हे तिघेही भादंवि कलम 420, 34 अंतर्गत दोषी आढळल्याने त्यांना घाटंजी येथील दिवाणी व फौजदारी न्यायाधिश तथा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी ए. ए. उत्पात (Civil Judge Jr. Dn. & JMFC A. A. UTPAT) यांच्या न्यायालयाने तिन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा व प्रत्येकी 30 हजार रुपये द्रव्य दंड ठोठावण्यात आला. तर भादंवि कलम 409, 467, 468, 34 अन्वये त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. सदर प्रकरणात शासनातर्फे सहाय्यक सरकारी वकील ॲड. एन. आर. गायकवाड यांनी सरकारी पक्षाची बाजू मांडली. तर आरोपीतर्फे सुरवातीला ॲड. शाम कापरेकर (यवतमाळ) यांनी काम पाहिले. तसेच सदर प्रकरणात युक्तिवाद ॲड. एजाज तगाले (यवतमाळ) यांनी केले.


