मकरंद जाधव
तालुका प्रतिनिधी श्रीवर्धन
श्रीवर्धन : तालुक्यातील बोर्लीपंचतन येथील बहूचर्चीत बस स्थानकाच्या निवारा शेडचं भूमिपूजन बुधवार दि.१८ सप्टेंबर रोजी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत श्रीवर्धन मतदारसंघाच्या आमदार व महिला,बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते संपन्न झालं.तीन वर्षापूर्वी मा.न्यायालयाच्या आदेशाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बोर्लीपंचतन येथील अतिक्रमण हटाव मोहिमेत बस स्थानकाची निवारा शेडसुद्धा जमीनदोस्त करण्यात आली. निवारा शेड अभावी प्रवासी व विद्यार्थ्यांचे ऊन- पावसात खूप हाल होत होते.शालेय विद्यार्थ्यांना पास काढण्यासाठी श्रीवर्धनला जाण्याचा भुर्दंड शिवाय मुंबई किंवा अन्य ठिकाणहून रात्री उशीरा आलेल्या प्रवाशांच्या होणाऱ्या गैरसोयीबरोबरच गाड्यांच्या वेळेबाबत कोणतीच माहिती मिळत नसल्याने दिवसेंदिवस बस स्थानकाच्या निवारा शेडचा प्रश्न गंभीर होत चालला होता.ग्रामस्थांनी ग्रामसभेत आणि पत्रकारांनी वेळोवेळी या विषयावर आवाज उठवल्याने ग्रामपंचायतीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे बस स्थानकाच्या निवारा शेडसाठी जागेची मागणी केली.पंचक्रोशीतील महत्वाची बाजारपेठ असल्याने आजूबाजूच्या खेडेगावातील बाजारहाट करण्यासाठी येणारे ग्रामस्थ,मुंबई,पूणे,नालासोपारा, मिरज या लांब पल्ल्याच्या ठिकाणी प्रवास करणारे प्रवासी,शाळा कॉलेजला येणारे विद्यार्थी यांचे होणारे हाल या सर्वांचा विचार करुन सार्वजनिक बांधकाम विभागाने जून्या बस स्थानकाच्या बाजुलाच जागा उपलब्ध करून दिल्याने निवारा शेड लवकरच मार्गी लागणार असं दिसत असताना त्या जागेशी कोणाचा काहीही संबध नसताना विनाकारण होणाऱ्या विरोधामुळे कोणाचं तरी वैयक्तीक हित जपण्यासाठी हा विरोध होत आहे का? असा प्रश्न ग्रामस्थांना पडला होता.अशा अनेक अडचणींना तोंड देत सरपंच ज्योती परकर यांनी ग्रामसभेत झालेल्या ठरावानूसार लवकरच त्याचं भूमिपूजन होईल अशी घोषणा केली.त्यानूसार १५ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनी सदर निवारा शेडचं त्यांनी भूमिपूजन केलं.तरीसुद्धा काम सुरु होण्यास विलंब होत असल्याने आमदार आदिती तटकरे यांनी ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा अंतर्गत या कामासाठी सात लाख रुपये निधी मंजूर करुन या निवारा शेडचं भूमिपूजन केलं.दोन वेळा भूमिपूजनाचं भाग्य लाभलेल्या या बस स्थानकाच्या निवारा शेडच्या बांधकामाचा प्रवास निर्विघ्नपणे पुर्ण होऊन गेली तीन वर्षे निवारा शेड अभावी उन,वारा,पावसाचा मारा सहन करीत बसची प्रतिक्षा करणाऱ्या प्रवासी व विद्यार्थ्यांचे हाल लवकरच संपावे अशी आशा प्रवासी आणि ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.
“गेले वर्षभर बस स्थानकाच्या निवारा शेडसाठी सर्वांच्या सहकार्याने मी प्रयत्नशील होते.यामध्ये येणाऱ्या असंख्य अडचणींना सामोरे जात मंत्री आदिती तटकरे यांच्या सहकार्याने हे काम मार्गी लागलं आहे.आता यामध्ये कोणतेही राजकारण करुन कोणीही विनाकारण अडथळे न आणता लवकरात लवकर ही शेड उभी राहून पंचक्रोशीतील प्रवासी आणि विद्यार्थ्यांचे हाल संपावे यासाठी सर्वांनी सहकार्य करावं.”
– ज्योती परकर
सरपंच बोर्लीपंचतन
“बोर्ली पंचक्रोशीचा वेगाने वाढणाऱ्या विस्ताराचा भविष्याच्या दृष्टीने विचार करुन ग्रामसभेत झालेल्या ठरावानुसार यापूढे कोणाच्याही विरोधाला न जुमानता उपलब्ध असणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेवर सर्व सोयींयुक्त अशी शेड उभी रहीली तर पंचक्रोशीतील बसने प्रवास करणारे प्रवासी आणि विद्यार्थ्यांबरोबरच बोर्लीपंचतन बस स्थानकातून श्रीवर्धन,हरीहरेश्वर,दिवेआगर,मुरुड-जंजिरा या प्रसिध्द पर्यटन स्थळांना भेट देणाऱ्या पर्यटकांचीही सोय होईल.”
- चंद्रकांत धनावडे
श्रीवर्धन तालुका प्रचार संयोजक माहिती अधिकार कार्यकर्ता