गुवाहाटी : आसाम राज्याच्या 3.50 कोटी लोकसंख्येतील मुस्लिमांचे प्रमाण 1.40 कोटींवर गेले आहे. या धर्तीवर राज्यातील 5 मूळ आदिवासी मुस्लिम समाजाच्या सामाजिक-आर्थिक स्थितीचा आढावा घेण्याचा निर्णय हिमंता बिस्वा सरमा सरकारने जाहीर केला आहे. मूळ आदिवासी मुस्लिम समाजाच्या विकासासाठी हे सर्वेक्षण होणार असल्याचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांनी सांगितले. गोरिया, मोरिया, देशी, सय्यद आणि जोल्हा या मुस्लिमांतील जातींचा सर्व्हे या निर्णयांतर्गत होईल. राज्य सरकारने जवळपास 8 महिन्यांच्या अवकाशानंतर राज्यात पुन्हा बालविवाहाविरुद्ध कारवाई सुरू केली आहे. बालविवाह आणि बहुविवाहासारख्या कुप्रथेचे समर्थन करणार्या मुस्लिमांच्या मतांची भाजपला गरज नाही. आधुनिक व राष्ट्रीय विचारांचे मुस्लिम भाजपसोबतच आहेत, असे वादग्रस्त विधान नुकतेच सरमा यांनी केले होते. आतापर्यंत 1040 जणांना बालविवाह प्रकरणात अटक करण्यात आली आहे. याआधीच्या पहिल्या टप्प्यात राज्यात सुमारे 3 हजार लोकांना अटक करण्यात आली होती. 2 आणि 3 ऑक्टोबरच्या रात्रींत मिळून 916 आरोपींना अटक करण्यात आली आहे. एकूण 706 प्रकरणे नोंदवली गेली आहेत.
2011 च्या जनगणनेनुसार, मुस्लिमांची एकूण संख्या 1.06 कोटी होती. ही एकूण लोकसंख्येच्या 34.22% होती. त्यात वाढ होऊन सध्या ती 40 टक्क्यांवर गेल्याचा राज्य सरकारचा अंदाज आहे. आसामची लोकसंख्या सुमारे 3.50 कोटी आहे. यात 1.40 कोटी मुस्लिम आहेत. जम्मू-काश्मीरनंतर आसाम हे एकूण लोकसंख्येतील मुस्लिमांच्या टक्केवारीच्या हिशेबाने देशात दुसरे मोठे राज्य आहे. आसाममध्ये इस्लाम दुसरा सर्वात मोठा धर्म आणि लोकसंख्येच्या हिशेबानेही सर्वात वेगाने वाढणारा धर्म आहे. खासगी मदरशांची महत्त्वाची भूमिका आहे. राज्यातील 11 जिल्ह्यांत 52 ते 99 टक्क्यांपर्यंत मुस्लिम लोकसंख्या आहे. अन्य 8 जिल्ह्यांतून मुस्लिम लोकसंख्ये वेगवान वाढ आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकार या जिल्ह्यांतील मुस्लिमांचा अल्पसंख्याक दर्जा काढून घेण्याच्या विचारात आहे. वरिष्ठ अधिकार्यांनीही त्याला दुजोरा दिला आहे.