मुंबई : निवडणुका जवळ येत असताना ट्रिपल इंजिन सरकारचे तिसरे इंजिन असलेल्या अजित पवारांनी खडखडाट सुरू करताच पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली. अपेक्षेनुसार अजित पवार यांच्याकडे पुण्याचे पालकमंत्रिपद आले, तर चंद्रकांत पाटील यांना त्याबदल्यात सोलापूर आणि अमरावती या दोन जिल्ह्यांची पाटीलकी देण्यात आली. हसन मुश्रीफ यांचे कोल्हापूरचे पालकमंत्री होण्याचे स्वप्न पूर्ण झाले. या सर्व हालचालीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र आपल्या पक्षाकडील कोल्हापूर व परभणी वगळता अन्य जिल्हे कायम ठेवले असून, राज्यात आपण बॉस असल्याचे सांगणाऱ्या भाजपला मात्र पाहुण्यांचे हट्ट पुरवता पुरवता अक्षरशः नाकीनऊ आले आहेत. शिवसेना-भाजप सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर अजित पवारांनी सातत्याने पालकमंत्रिपदांची मागणी लावून धरली होती. गेल्या काही दिवसांपासून तर ते नाराजी जाहीरपणे दाखवत होते. आजारपण वारंवार उफाळून येत असल्याने ते सरकारच्या कार्यक्रमांना उपस्थित राहात नव्हते. कालच्या मंत्रिमंडळ बैठकीलाही अजित पवारांनी दांडी मारली आणि त्याची चर्चा सुरू झाली. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन नेतृत्वाशी चर्चा करून पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली. आता आपल्यासोबत आलेल्या अन्य आमदारांनाही सत्तेत वाटा मिळावा यासाठी पवार यांचा आग्रह असेल. आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार, महामंडळे तसेच राज्यपालनियुक्त आमदारांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत. त्याही लवकरच होण्याची शक्यता आहे. शिंदे व पवार यांच्या रस्सीखेचीत भाजपच्या निष्ठावंतांच्या हाती यावेळी काय लागते हे पहावे लागेल.
अमरावती, वर्धा, अकोला व भंडारा हे जिल्हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होते. आता नागपूर व गडचिरोली या जिल्ह्यांचे पालकत्व त्यांच्याकडे असेल. त्यांच्याकडील चारही जिल्हे भाजपकडेच राहिले आहेत. शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांच्याकडे जळगावचे पालकमंत्रिपद कायम राखताना त्यांच्याकडील बुलढाणा जिल्हा मात्र दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. शिवसेनेच्याच तानाजी सावंत यांच्याकडे धाराशिव व परभणी हे दोन जिल्हे होते. त्यापैकी परभणी जिल्ह्याचे पालकमंत्रीपद राष्ट्रवादीच्या संजय बनसोडे यांच्याकडे सोपविण्यात आले आहे.