अशोक गायकवाड
ग्रामीण प्रतिनिधी ढाणकी
ढाणकी शहरातील नागरीक तीव्र पाणीटंचाईशी सामना करत असुन याला जबाबदार सर्वस्वी नगरपंचायतचे दिसाळ नियोजन असल्याचे नागरीकांचे मत आहे. सध्या पावसाळा लागला असून काही अंशी तरी नागरीकांना पाण्याबाबत निसर्गा कडुन दिलासा मिळेल अशी आशा होती मात्र निसर्ग ही कोपल्यामुळे पाण्यासाठी दाही दिशा फिरण्याची वेळ नागरीकांवर आली शहरातील नागरीकांना आजच्या स्थितीला पाणी विकत घेवुन आपली गरज भागवावी लागत असून नगरपंचायत प्रशासन काय करत आहे? असा संतत्प सवाल नागरीक करत आहेत.
ढाणकी शहरापासुन अवघ्या पाच किमी अंतरावर पैनगंगा नदी असुन सुध्दा शहराला सुरळित पाणी पुरवठा होऊ शकत नाही हे दुर्दैवच म्हणावे लागेल. नगरपंचायत झाल्यावर पहिल्याच बैठकित ढाणकी शहराची पाणी समस्या निकाली काढण्याचे ठरवलेले असताना पाणी कुठे मुरत आहे हे नागरिकांना कळायला मार्ग नाही. शहरातील पाणी पुरवठा करणा-या जलवाहिण्या सुध्दा अत्यंत जुण्या झालेल्या आहेत त्यांची सुद्धा दुरुस्ती करणे गरजेचे आहे. शहरातील शिक्षक कॉलनी मध्ये तर आज पर्यंत सुध्दा नगरपंचायत सुरळीत पाणी पुरवठा करू न शकल्याने नगरपंचायतच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित राहत आहे. काही दिवसापुर्वीच संतापलेल्या महिलांनी नगरपंचायतचे टाळे तोडुन आपला संताप व्यक्त केला होता. तेव्हा कोठे थोडी नगरपंचायत ला जाग येवुन पाणीपुरवठा विभागाचे अभियंता यांनी गांजेगाव येथे जावून पाईपलाईनचे काम पाहिल्याची चर्चा आहे. आज पर्यंत साहेबांनी मात्र या कामाची स्थिती जानुन घेण्यात कुठलाही रस दाखवला नव्हता. नगरपंचायत चा बराचसा कारभार सध्या प्रभागावर चालु असल्याने साहेबलोकांचे ढाणकीला नियमीत येणे होत नाही आणि याचा परिणाम मात्र शहरातील विकास कामावर होत आहे. तरी ढाणकीची पाणी समस्या कधी मिटेल आणि पाण्याचे सुख नागरीकांना कधी मिळेल हे देवच जाणो.


