मुंबई : शिक्षकांची ३० हजार पदे भरण्याचा निर्णय घेतानाच शालेय शिक्षण विभागाने शिक्षकांच्या बदलीबाबत कठोर निर्णय घेतला आहे. त्यानुसार यापुढे शिक्षकांना आंतरजिल्हा बदली घेता येणार नाही. नवीन भरतीतील शिक्षकांसाठी आंतरजिल्हा बदली करताना जुन्या शिक्षकांनाही जिल्हा निवडण्याची एकमेव संधी देण्यात आली आहे. आंतरजिल्हा बदली हवीच असल्यास नोकरीचा राजीनामा द्यावा लागणार असून नव्याने अर्ज करावा लागेल. ज्या जिल्ह्यात भरती निघेल त्या जिल्ह्यात अर्ज करून शिक्षकांकडून नाेकरी पटकावली जाते. मात्र, एकदा नोकरी मिळाली की आपल्याला हव्या त्या जिल्ह्यात पुन्हा बदली करून घेतली जाते. यामुळे जिल्हा परिषदांच्या शाळांत पदे रिक्त राहतात. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. शिक्षण सेवक कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्या शिक्षकाच्या सेवेचे मूल्यमापन करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था तसेच जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांच्या स्तरावर संयुक्त समिती गठित करण्यात येणार आहे..