मुंबई : उद्धव ठाकरेंनी भाजपसोबतची युती तोडून काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केल्यापासून ठाकरे-फडणवीसांमध्ये संघर्ष सुरु झाला. कालांतराने हा संघर्ष शिगेला पोहोचला आणि याच संघर्षातून शिवसेनेत फूट पडून ठाकरेंचं सरकारही कोसळलं. त्यानंतर ठाकरे आणि फडणवीसांमध्ये वारंवार आरोप-प्रत्यारोप होत आहेत, पण हे सगळं घडत असलं, तरी आपण शत्रू नसल्याचं सांगत फडणवीस वारंवार ठाकरेंविरोधात संघर्ष केवळ राजकीय असल्याचं सांगत आहेत. आता देवेंद्र फडणवीसांच्या या आवाहनाला ठाकरेंकडून सकारात्मक प्रतिसाद मिळालाय.. आदित्य ठाकरेंना फडणवीसांसंदर्भात विचारणा केली असताना, त्यांनीही देवेंद्र फडणवीसांना मित्र मानत असल्याचं सांगितलं. आदित्य ठाकरेंच्या या भूमिकेनंतर फडणवीसांनी पुन्हा एकदा ठाकरेंसोबत केवळ वैचारिक विरोध असल्याचं सांगितलं. राजकारणात वैचारीक विरोध असतो, उद्धव ठाकरे किंवा आदित्य माझे शत्रु नाहीत. वैचारिक विरोधक झालोय, कारण त्यांनी दुसरा विचार पकडलाय, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षाने आता टोक गाठलं आहे. रोजच दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी चढत असतानाच राज्याच्या राजकारणात नवे ट्विस्ट येत आहेत. त्यातच आता फडणवीस आणि ठाकरेंकडून आलेली ही वक्तव्य भविष्यातल्या नव्या धक्कातंत्राची नांदी तर नाही ना? याबाबत मात्र चर्चा सुरू झाल्या आहेत.


