लातूर : सोयाबीनच्या भावात विक्रमी वाढ झाली असून सोयाबीनचा भाव गुरुवारी सात हजार ३३० रुपये क्विंटलवर पोहोचला होता, तो शुक्रवारी ७ हजार २०० रुपये क्विंटलवर आला. रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोयाबीनच्या भावात ही चढ-उतार होत असल्याचे सांगण्यात येते. सोयाबीनचा भाव ८ फेब्रुवारी रोजी ६ हजार रुपये क्विंटल होता तो १० फेब्रुवारी रोजी ६ हजार ४०० रुपये भाव झाला. रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर आता मोहरीचाही भाव वाढला आहे. सोयाबीनचा हमीभाव ३ हजार ९५० रुपये असून यावर्षी ६ हजार ८०० रुपयांपर्यंत भाव वाढले होते.मात्र ,त्यानंतर भाव कमी व्हायला लागले. देशातील पाच राज्यांमधील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खाद्यतेलाचे भाव वाढू नयेत यासाठी केंद्र सरकार आटोकाट प्रयत्न करत आहे. त्या प्रयत्नाचा भाग म्हणून खाद्यतेलावरील आयात शुल्क शून्य करण्यात आले. केंद्र शासनातर्फे भाव वाढू नयेत म्हणून उपाययोजना केल्या जात असल्या तरी आंतरराष्ट्रीय स्थिती मात्र वेगळी आहे. अर्जेटिनामधील दुष्काळ तर ब्राझीलमधील अतिवृष्टी यामुळे २३० लाख टन सोयाबीन उत्पादनात घट होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळेही सोयाबीनचे भाव वाढत आहेत. गेल्यावर्षी सोयबीनचा भाव दहा हजार रुपये क्विंटलपर्यंत होता. यावर्षी तो सात हजाराच्या पार झाल्यानंतर बाजारपेठेत थोडीशी आवक वाढत आहे. गुढीपाडव्यापर्यंत सोयाबीनला चांगले भाव मिळतील आणि नवीन वर्षांत शेतकऱ्यांना हातात चार पैसे अधिक येतील अशी अपेक्षा आहे. लातूर बाजारपेठेत सोयाबीनचे भाव वाढत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आता आनंदाचे वातावरण आहे.