मुंबई : राज्य सरकारच्या वादग्रस्त ठरलेल्या वाईनविक्रीचा निर्णय आता सरकार मागे घेण्याची शक्यता आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलेल्या एक विधानावरुन या चर्चांना सुरुवात झाली आहे.
राज्य सरकारने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला दिलेली परवानगी आणि त्याला होत असलेला विरोध हा काही फारसा महत्वाचा विषय नाही. मात्र जर सर्व स्तरातून विरोध होत असेल आणि सरकारने या संदर्भात निर्णय बदलला तरी त्याचे आपल्याला वाईट वाटण्याचे कारण नाही अशी प्रतिक्रिया देत त्यांनी निर्णय मागे घेण्याचे संकेत दिले आहेत.
बारामतीमधील गोविंदबाग या निवासस्थानी शरद पवार पत्रकारांशी बोलत होते. राज्य सरकारच्या सुपर मार्केट मधील वाईन उपलब्ध करून देण्याच्या निर्णयावर भाजपसह काही संघटनांनी विरोध केला आहे, या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले, देशभरातील सर्वच राज्यांमधील दुकानांमध्ये देशी आणि विदेशी दारु मिळते. त्यामध्ये वाईन देखील मिळते. त्यात नवीन काहीच नाही. आता केवळ मॉल आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विकायला परवानगी देण्यत आलेली आहे. मात्र जर त्याला विरोध होत असेल आणि मागे घेतला तरी त्याबद्दल आपल्याला वाईट वाटण्याचे कारण नाही.
याशिवाय वाईन आणि दारु यातील फरक समजून घेणे गरजेचे आहे. देशातील सर्वाधिक द्राक्ष उत्पादन त्यावरुन वाईन १८ वायनरी वाईनचे उत्पादन हे नाशिक जिल्ह्यात होते. ही वाईन केवळ मोठ्या मॉल्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यासंदर्भात सरकारने मंजुरी दिली आहे. वायनरींच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न मिळते. मात्र त्याला विरोध होत असेल तर सरकारने या संदर्भात काही वेळा निर्णय घेतला, तो निर्णय मागे घेतला तरी त्याचे काही वाईट वाटायचे कारण नाही.
राज्य सरकारने नुकतेच वाईन उद्योगाला चालना देण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. सुपर मार्केटमध्ये वाईन विकण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. एक हजार चौरस फूटापेक्षा मोठ्या दुकानांत शोकेस निर्माण करून वाईन विकता येईल. ही वाईन सध्या बार किंवा मद्याच्या दुकानांतच मिळते. ती आता ग्रोसरी स्टोअरमध्येही मिळू शकणार आहे. मात्र भाजपसह इतर धार्मिक संघटनांकडून या निर्णयाला तीव्र विरोध होत आहे.


