सचिन संघई जिल्हा प्रतिनिधी वाशिम
अनसिंग दि.०५जाने.:- अनसिंग येथील श्री पद्मप्रभ दिगंबर जैन कला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व इतिहास विभागाच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डाँ. विवेक गुल्हाने तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा. अलीमखान पठाण हे उपस्थित होते. यावेळी सर्व प्रमुख पाहुण्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यानंतर महाविद्यालयातील विद्यार्थिनी प्रतीक्षा सातव, आरती इंगळे, संजीवनी आळणे या विद्यार्थिनीनीं आम्ही सावित्रीबाई फुले मुळे कसे घडलो, महिलांच्या मुक्ती मध्ये सावित्रीबाई फुले यांचे किती अनमोल योगदान आहे, यावर महत्त्वपूर्ण स्वरूपाचे भाष्य केले. प्रमुख अतिथी म्हणून बोलताना प्रा. अलीम पठाण यांनी सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षण, समाजजागृती, आरोग्यरक्षण, अंधश्रद्धा आदि विविध कार्याचा संदर्भ घेत महिलांच्या उन्नतीसाठी त्यांनी केलेले आभाळभर प्रयत्न मानवजातीवर केलेले फार मोठे उपकार आहेत. म्हणून सावित्रीबाई खऱ्या अर्थाने ही स्त्री-मुक्ती चळवळीच्या, नवे स्त्री सबलीकरणाच्या पहिल्या कर्त्या सुधारक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. याच वेळी प्रमुख वक्ते म्हणून प्रा. सचितानंद बिच्चेवार यांनी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या ऐतिहासिक कार्याचा संदर्भ देऊन आपण त्यांच्या विचार कृतीतून प्रेरणा घेऊन स्वतःही घडलो पाहिजे आणि समाजालाही घडविण्यासाठी पुढे आलो पाहिजे. यासाठी निश्चितच सावित्रीबाई फुले जयंती संकल्प करण्याचा एक महत्त्वाचा दिवस असल्याचे सांगितले. सावित्रीबाईंच्या यातना व दायित्व यापासून आपण प्रेरणा घेऊन पुढे वाटचाल केली पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलताना डाँ. विवेक गुल्हाणे यांनी सावित्रीबाई फुले खऱ्या अर्थाने मानव मुक्तीचे काम करणाऱ्या आद्य शिक्षिका, मुख्याध्यापक, स्त्री सुधारक व भारताच्या उन्नतीचा फार मोठा भार उचलणाऱ्या कर्त्या सुधारक असल्याचेही मत व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाचे संचालन कु. आचल सरतापे, तर आभार कु.वैष्णवी गैरवार यांनी मांडले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुनिल वराडे, संजय जोगदंड व बीए भाग 1 व 3 च्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.











