भारतीय संघाचा सर्वकालीन महान फिरकीपटू हरभजन सिंग याने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केली आहे. आपल्या ट्विटर हँडलवरून त्याने एक पोस्ट शेअर करत. याबाबत माहिती दिली.
हरभजनच्या निवृत्तीसह भारतीय क्रिकेटचा सुवर्णकाळ समजल्या जाणाऱ्या १९९९ ते २०१२ या काळातील सर्व खेळाडू निवृत्त झाले आहेत.
हरभजन याने केलेल्या ट्विटमध्ये लिहिले,
‘प्रत्येक चांगल्या गोष्टीला अंत असतो. मला त्या खेळाला आता अलविदा करण्याची वेळ आली आहे, ज्या खेळाने मला सर्वकाही दिले. मला त्या सर्वांना धन्यवाद द्यायचे आहे ज्यांनी या २३ वर्षाच्या शानदार प्रवासात साथ दिली.’
अशी राहिली आंतरराष्ट्रीय कारकीर्द
हरभजन सिंग याने आपल्या २३ वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत १०३ कसोटी सामने खेळताना ४१७ बळी मिळवले. तर २३६ वनडे सामन्या त्याच्या नावे २६९ बळी जमा आहेत. याव्यतिरिक्त टी२० क्रिकेटमध्ये त्याने २८ सामने खेळताना २५ बळी मिळवले होते. तो आयपीएलमध्ये १५० बळी पूर्ण करणारा केवळ चौथा गोलंदाज होता. आयपीएलमध्ये त्याने मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स व कोलकाता नाईट रायडर्स या संघाचे प्रतिनिधित्व केले. हरभजन २००७ टी२० विश्वचषक व २०११ वनडे विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य होता. अनिल कुंबळे यांच्यानंतर त्याने अनेक वर्ष भारतीय क्रिकेटच्या फिरकी आक्रमणाची धुरा सांभाळली.