दुबई (वृत्तसंस्था) : वेस्ट इंडिजमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या आयसीसी १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. भारत ग्रुप बीमध्ये असून या ग्रुपमध्ये दक्षिण आफ्रिका, आयर्लंड आणि युगांडाचा समावेश आहे. १४ जानेवारी ते ५ फेब्रुवारी दरम्यान सुरू होणारी ही स्पर्धा २३ दिवसांची असेल.
वेस्ट इंडिजमधील चार शहरांत ही स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. यात १६ संघ सहभागी होणार आहेत. एकूण ४८ सामने होतील. गतविजेते बांगलादेश, इंग्लंड, कॅनडा आणि युएईला ग्रुप एमध्ये स्थान देण्यात आले आहे, तर ग्रुप सीमध्ये पाकिस्तान, अफगाणिस्तान, झिम्बाब्वे आणि पापुआ न्यू गिनी या संघांचा समावेश आहे. ग्रुप डीमध्ये वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका आणि स्कॉटलंड याचा समावेश आहे.
सक्तीच्या क्वारंटाइन नियमांमुळे न्यूझीलंडने या स्पर्धेतून माघार घेतली आहे. स्पर्धेचे आयोजन एंटीगा आणि बारबुडा, ग्याना, सेंट किट्स आणि नेविस, त्रिनिदाद आणि टोबॅगो हे करणार आहेत.
प्रत्येक ग्रुपमधून दोन संघ सुपर लीग स्पर्धेत पोहोचतील. सेमीफायनल १ आणि २ फेब्रुवारी रोजी, तर फायनल ५ फेब्रुवारी रोजी सर व्हिव्हिएन रिचर्ड्स क्रिकेट मैदानावर होणार आहे.
भारतीय संघाला ग्रुप फेरीत किमान दोन सामने जिंकावे लागतील. असे झाले तरच भारत पुढील फेरीत प्रवेश करेल. गेल्या स्पर्धेत भारत अंतिम फेरीपर्यंत पोहोचला होता, पण बांगलादेशकडून भारताचा पराभव झाला होता. यावेळी भारताला नवा कर्णधार मिळाला असून संघाला विजेतेपदाची आशा आहे.