देसाईगंज येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शेतकरी व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन.
सौ.निलिमा बंडमवार
उपजिल्हा प्रतिनिधी गडचिरोली.
गडचिरोली-: आदिवासीबहुल जिल्हा म्हणून गडचिरोली जिल्ह्याची ओळख देशामध्ये आहे.जिल्ह्यात अनेक समस्या आहेत.विकासाच्या संबंधी अधिक लक्ष देण्याची गरज आहे.आदिवासी समाजाची तरुण पिढी जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये यशस्वी कशी होईल यासाठी सरकारने योजना आखून त्याची अंमलबजावणी करायची आहे.त्यादृष्टीने हा जिल्हा अत्यंत महत्वाचा आहे.वनवासी हा शब्द आदिवासींना मंजूर नाही. आदिवासी हेच देशाचे खरेे मुळनिवासी आहेत.त्यामुळे आदिवासींना वनवासी म्हणु नका. आदिवासींना खऱ्या अर्थाने मूलनिवासी यांच्या संबंधाने राष्ट्राची नीती वेगळी असली पाहिजे.आज या देशामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट वनसंपत्ती.आदिवासी हे तीन गोष्टींचे संवर्धन करतो जल,जंगल आणि जमीन.याचे खरे मालक सुद्धा आदिवासीच आहेत.राज्यात जेवढे इरिगेशनचे प्रकल्प झाले तेथे जास्तीत जास्त प्रकल्पात आदिवासींच्या जमिनी गेल्या आहेत.आदिवासींच्या क्षेत्रात पाण्याचा साठा झाला आणि देशाच्या अन्य भागातील लोकांना त्याचा लाभ घेता आला.आता तुम्ही बघाल देशातील जंगलाच्या रक्षणाचे काम आदिवासी करत असतो आणि त्यासोबत जंगल,जमीन सांभाळण्याचे काम आदिवासी करत असतो.याचा अर्थ मूलभूत गोष्टींची राखण करणारा वर्ग हा आदिवासी आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भव्य शेतकरी,शेतमजूर,कार्यकर्ता मेळावा तथा पक्षप्रवेश सोहळा देसाईगंज येथील तालुका क्रिडा संकुल पटांगणात दि.18 नोव्हे रोजी पार पडला.त्याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार बोलत होते.
कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक लाभलेले प्रफुल पटेल यांनी नाना नाकाडे यांच्या पक्ष प्रवेशावर भाष्य केले.नाना नाकाडे या एका व्यक्तीचा नाही.चांगल्या घराण्याचा व नेत्याचा प्रवेश आहे.त्याचप्रमाणे झाडी पट्टीतील ऐंशी टक्के लोक शेतीवर अवलंबून आहे.त्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या धानाला बोनस नक्कीच मिळेल अशी ग्वाही त्यांनी दिली.काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही दिवसांपूर्वी विदर्भातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दुकान बंद होईल अशी टीका केली.त्यावर कार्यक्रमाचे आयोजक धर्मरावबाबा आत्राम यांनी जोरदार टीका करत जोरदार प्रत्युत्तर दिले.येत्या निवडणुकीत जिल्हा परिषद गडचिरोलीवर राष्ट्रवादीचा झेंडा रोवणार.आरमोरी विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार निवडून आणण्यास तयारी करण्याचे सूचक आव्हान केले.आणि सन 2019 ला अहेरी विधान सभेतून लढलेली निवडणूक हि अखेरची होती.त्यामुळे धर्मरावबाबा आत्राम यांनी गल्ली ते दिल्ली असा प्रवास झाला पाहिजे असे मत व्यक्त केले. याचा अर्थ पुढील सन 2024 च्या गडचिरोली-चिमुर लोकसभा निर्वाचन क्षेत्रात धर्मरावबाबा आत्रामच उभे राहणार हे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे खुद्द शरद पवार यांनी धर्मरावबाबा यांच्या अप्रत्यक्ष मागणीला दुजोरा देत होकार दिला.या मेळाव्या कार्यक्रमात माजी केंद्रीय उड्डाण मंत्री प्रफुल्ल पटेल तसेच प्रमुख अतिथी केंद्रीय राज्यमंत्री सुबोध मोहिते,अहेरी क्षेत्राचे आमदार धर्मरावबाबा आत्राम,माजी खासदार मधुकर कुकडे,जि. प. सदस्य भाग्यश्री आत्राम,अर्जुनी मोरगांवचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे, तूमसरचे आमदार राजू कारेमोरे,माजी आमदार हरीराम वरखडे, माजी न्यायाधीश ज्ञानदेव परशुरामकर, माजी आमदार राजेंद्र जैन,सुनील फुंडे,प्रविण कुंटे,श्रीकांत शिवणकर, रूतूराज हलगेकर,जगदीश पंचबुद्धे,वंदना आवळे,गंगाधर परशुरामकर, रमेश बंग उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक राकाँ जिल्हाध्यक्ष रविंद्र वासेकर यांनी केले.संचालन सुरेंद्र अलोने तर आभार युनूस शेख यांनी केले.सदर कार्यक्रमाला गडचिरोली जिल्ह्याच्या संपूर्ण बाराही तालुक्यातील लोक हजारोच्या संख्येने हजर झाले होते.











