मुंबई: भारतीय हवामान विभागानं दिलेल्या अंदाजाप्रमाणं राज्याची राजधानी मुंबईत जोरदार पाऊस सुरु आहे. आरे परिसरात रात्रभर मुसळधार पाऊस झाला. तर, हवामान विभागानं मुंबईला यलो अलर्ट दिला असून जोरदार पाऊस सुरु आहे. मुंबईच्या चेंबूर, घाटकोपर आणि सायन परिसरात मुसळधार पाऊस झाला. आयएमडीनं महाराष्ट्रात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांना यलो अलर्ट देत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. नागरिकांनी सतर्क राहावे, असं देखील सांगण्याचत करण्यात आलं आहे.
कोकण पश्चिम महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट
हवामान विभागानं सोमवारसाठी पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा आणि कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर, मुंबई, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, बीड, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, वाशिम, बुलडाणा, अकोला, यवतमाळ, वर्धा, नागपूर, अमरावती, आणि गोंदिया, भंडारा, गडचिरोली जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे.
ठाण्यासह वसई विरारमध्ये रात्री जोरदार पाऊस
ठाणे आणि वसई विरारमध्ये रविवारी रात्री जोरदार पाऊस झाल्याचं समोर आलं होतं. वसई विरारमध्ये रात्री दहाच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला. मध्यरात्रीनंतर वसई विरारमध्ये पावसानं उघडीप घेतली होती.
नाशिकमध्ये रात्रभर पाऊस
नाशिक जिल्ह्यात आणि शहर परिसरात रात्रभर पावसाची संततधार सुरु होती. धरण पाणलोट क्षेत्रात देखील रात्रभर पाऊस झाला आहे. नाशिकच्या गंगापूर धरणातून आज पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता आहे. काल गंगापूर धरणातून करण्यात 500 क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. गोदावरी घाटाजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यात मुसळधार पावसाचा इशारा
येत्या तीन ते चार दिवसात महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर वेगानं वारे वाहतील. तसेच राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो असा, अंदाज वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र आज तीव्र झाले आहे. प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्यावतीनं हवामानाचा अंदाज जारी करण्यात आला आहे. तर, पुढील चार ते पाच दिवसांसाठी विविध जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अॅलर्ट जारी करण्यात आले आहेत. हवामानतज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे.
14 सप्टेंबरला पावसाची स्थिती कशी?
हवामान विभागानं मंगळवारी पालघर, ठाणे, रायगड,पुणे, सातारा आणि कोल्हापूरला ऑरेंज अॅलर्ट जारी केला आहे. तर, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नांदेड, परभणी, हिंगोली, नाशिक, नंदूरबार, जळगाव, धुळे, औरंगाबाद, जालना, बीड, आणि अमरावती यलो अॅलर्ट दिला आहे.
15 सप्टेंबरला पावसाची स्थिती कशी?
हवामान विभागानं पालघर जिल्ह्याला ऑरेंज अॅलर्ट जारी केला आहे. तर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, ठाणे, सातारा, पुणे जिल्ह्यांना यलो अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, गुरुवारी 16 सप्टेंबरला पालघर जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

