रवि राठोड
ग्रामीण प्रतिनिधी वाकान.
वाकान : महागांव तालुक्यातील घोणसरा गावांत एका शेतकऱ्याने सततची नापीकी आणि कर्जबाजारीला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.सखाराम सुभाष झोलांडे वय वर्षे (३३) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचे नांव आहे.मिळालेल्या माहिती नुसार सखाराम झोलांडे हे अल्पभूधारक शेतकरी होते.त्यांच्याकडे पाच एकर शेती असुन त्यांचेवर दिड लाखाचे कर्ज होते.सततची नापीकी आणि कर्जांचा वाढता बोजा यामुळे ते चिंतेत होते.या नैराश्यातून त्यांनी २७ मार्च रोजी आपल्या शेतातील झाडाला गळफासा लावुन आपली जीवन यात्रा संपवीली आणि मृत्युला कवटाळले.झोलांडे यांच्या मृत्यूमुळे गावात शोककळा पसरली आहे.ते मनमिळाऊ स्वभावाचे होते.त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा,आई वडील आणि दोन भावंडे असा आप्त परिवार आहे.या घटनेवर प्रतिक्रिया देतांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष मनिष जाधव म्हणाले, शेतकऱ्यांचे जगणे निखाऱ्यावर झाले आहे.शेतमालाला भाव नाही, सततची नापीकी आणि कर्जबाजारीपणा यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत. निवडणूकीच्या वेळी दिलेली कर्जमाफीची आश्वासने वांझोटी ठरल्याने एका मागे एक शेतकरी आत्महत्या करत आहेत.यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे.मात्र सतेवर विराजमान असलेले लोकप्रतिनिधी कुंभकर्णाच्या निद्रेत आहे की काय असा प्रश्न पडत आहे.शासनाने शेतकऱ्यांच्या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष केंद्रीत करून तात्काळ उपाययोजना करण्याची गरज आहे.


