आनंद मनवर
जिल्हा प्रतिनिधी रायगड
पाली – नुकतीच सुधागड तालुका मराठा समाजाच्या पुढाकाराने तालुक्यातील सर्व समाज अध्यक्षांची बैठक संपन्न झाली. सुधागड तालुका मराठा समाजाचे अध्यक्ष धनंजय साजेकर हे झाल्यापासून गेले दोन वर्षात मराठा समाजाने वेगवेगळ्या क्षेत्रांत भरीव असे काम केलेले आहे . ते नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत आहेत याचीच प्रचिती पुन्हा आली आहे. त्यांच्याच संकल्पनेतून आणि सर्व संचालक मंडळाच्या सहमतीने व मराठा समाजाच्या पुढाकाराने पाली येथील मराठा समाज भवनात दिनांक २८ मार्च २०२५ रोजी सुधागड तालुक्यातील वेगवेगळ्या अशा एकूण १८ (अठरा) समाजाचे अध्यक्ष यांची बैठक झाली. एकाच वेळी अठरा समाजाचे अध्यक्ष एकत्र येऊन सकारात्मक चर्चा करणे ही एक खूप मोठी गोष्ट / घटना आहे. या बैठकीला खालील समाज अध्यक्ष उपस्थित होते. मराठा समाज श्री.धनंजय साजेकर,आगरी समाज – श्री. ललित ठोंबरे, आदिवासी समाज श्री. चंद्रकांत वाघमारे,बौद्ध समाज श्री. दिपक पवार ,श्री. सुरेंद्र शिंदे, ब्राह्मण समाज,श्री. धनंजय गद्रे, जैन समाज श्री. सुभाष ओसवाल,गुजराथी समाज श्री. अशोक मेहता,राव मराठा समाज श्री. भास्कर दुर्गे युवा अध्यक्ष,भोई समाज श्री. कमलाकर शिंदे, ठाकूर समाज श्री. गोविंद लेंडी, मुसलमान समाज श्री.सलाम पानसरे, कासार समाज श्री. परेश वडके, सोनार समाज श्री.संजय घोसाळकर, गुरव समाज श्री. प्रमोद खोडागाळे,नाभिक समाज श्री. रूपेश पवार, सुतार समाज श्री. रमेश सुतार ( जिल्हा उपाध्यक्ष), परीट समाज श्री. वसंत पालकर ( सुधागड-रोहा उपाध्यक्ष), या बैठकीत सुधागड तालुक्याचे हित, तालुक्यात शांतता, सलोखा व एकोपा रहावा , विविध सामाजिक प्रश्नांवर चर्चा करून मार्ग काढावा तसेच जाती-जाती / धर्मातील दूरी दूर व्हावी. सुधागड तालुक्यात परिवर्तन करून एकसंघ सुधागड निर्माण करावा याबाबतीत प्राथमिक स्तरावर चर्चा करण्यात आली. तालुक्यातील सर्व समाज एकत्रित करण्याचा महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रयोग असून सर्वच अध्यक्षांनी या बाबतीत मराठा समाज अध्यक्ष श्री. धनंजय साजेकर यांचे कौतुक केले व मराठा समाजाला धन्यवाद दिले. लवकरच तालुक्यातील उर्वरीत लहान मोठे सर्व समाज एकत्र करून राजकारण विरहित एकसंघ सुधागड निर्माण करण्याच्या मराठा समाजाच्या निर्धाराला सर्वांनी पाठिंबा दर्शिवला. या बैठकीत मराठा समाज कार्याध्यक्ष निंबाळकर सर यांनी सर्वांचे स्वागत केले. त्यानंतर मराठा समाज अध्यक्ष धनंजय साजेकर यांनी या बैठकीमागचा हेतू / उद्देश व पुढील भूमिका याबाबत सविस्तर माहिती दिली. सुधागड तालुक्यात आजपर्यंत नेहमीच शांतता राहिलेली आहे परंतु सध्या परिस्थितीत, डिजिटल मिडिया, सोशल मीडिया आणि इतर माध्यमे , बाहेरील घटना किंवा अन्य कारणांमुळे भविष्यात कोणताही अनुचित प्रकार/घटना आपल्या तालुक्यात घडू नये यासाठी हे संघटन असणे अत्यंत गरजेचे आहे असे साजेकर यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.आपण कोणत्याही परिस्थितीत या संघटनेत राजकारण येऊ द्यायचे नाही याची खबरदारी सर्वांनी घ्यावी असे गुजराथी समाज अध्यक्ष अशोकशेठ मेहता यांनी सांगितले. असे संघटन गरजेचे असून संख्येने लहान असलेल्या समाज बांधवांना उपयोग होईल अशा या सामाजिक संघटनेस पूर्ण पाठिंबा व सहकार्य असल्याचे ब्राह्मण समाज अध्यक्ष धनंजय गद्रे, जैन समाज अध्यक्ष सुभाषशेठ ओसवाल, आदिवासी समाज अध्यक्ष चंद्रकांत वाघमारे, गुरव समाज अध्यक्ष प्रमोद खोडागळे व ठाकूर समाज अध्यक्ष गोविंद लेंडी ,मुसलमान समाज अध्यक्ष सलाम पानसरे , परीट समाजाचे वसंत पालकर व नाभिक समाजाचे रुपेश पवार यांनी सांगितले. ही संकल्पना खूप महत्त्वाची असून त्यासाठी कोणतेही काम करण्याची तयारी सोनार समाज अध्यक्ष संजय घोसाळकर, भोई समाज अध्यक्ष कमलाकर शिंदे ,कासार समाजाचे परेश वडके तसेच सुतार समाजाचे व पाली पंचायत समिती माजी सभापती रमेश सुतार यांनी दाखवली. बौद्ध समाजाचे वतीने सुरेंद्र शिंदे यांनी याचे कौतुक केले व महत्व पटवून सांगितले. तर दीपक पवार यांनी या माध्यमातून सामाजिक प्रश्न,गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मदत आदी कामे करता येतील असे सांगितले. आगरी समाज अध्यक्ष ललित ठोंबरे यांनी या संकल्पनेचे कौतुक करून समाजा-समाजातील दरी कमी होईल व सुधागड मधे सलोखा वाढेल असे प्रतिपादन केले. राव मराठा समाजाचे युवा अध्यक्ष भास्कर दुर्गे यांनी अठरा पगड जाती तसेच इतर धर्मांना सोबत घेऊन जाण्याने आपण प्रभावित झालो असून हा एकोपा आपण सर्वजण मिळून कायम ठेवू असा विश्वास व्यक्त केला. वरील समाजांचे व्यतिरिक्त तालुक्यातील उर्वरित सर्व समाज अध्यक्षांनी ललित ठोंबरे, संजय घोसाळकर, परेश वडके यांच्याकडे अथवा वरील कोणत्याही अध्यक्षांसोबत संपर्क साधावा, एप्रिल महिन्यात पुन्हा सर्व समाज एकत्रित बैठक घेऊन पुढील निर्णय घेणार असल्याचे मराठा समाज अध्यक्ष धनंजय साजेकर यांनी सांगितले. यानंतर सुधागड तालुका मराठा समाज सरचिटणीस सुजित बारसकर यांनी सर्वांचे आभार व्यक्त करत सभा संपन्न झाली.


