राहुल दुगावकर,
तालुका प्रतिनिधी बिलोली
“योजकः तत्र दुर्लभ” या उक्तीप्रमाणे, समाजासाठी उपयुक्त कार्य घडविणारा दूरदृष्टीचा योजक शोधणे कठीण असते. कर्मयोगी बाबासाहेब देशमुख यांनी ६६ वर्षांपूर्वी संस्कृति संवर्धन मंडळाच्या माध्यमातून ग्रामीण विकासाची भक्कम पायाभरणी केली. त्यांच्या कार्याची महती अधोरेखित करणारा जन्मशताब्दी महोत्सव सगरोळी येथे आज २९ मार्च रोजी उत्साहात संपन्न झाला. तत्पूर्वी दि. २७ मार्च हा बाबासाहेब देशमुख यांच्या जन्मदिनी पंचक्रोशीतील भजनी मंडळाने अभंग गायन केले. संस्था आणि सगरोळी ग्रामस्थांच्या वतीने २०२५-२०२६ हे वर्ष जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर दि. २८ मार्च रोजी बाबांचे जन्मगाव पालम ते सगरोळी अशी ‘जन्मभूमी ते कर्मभूमी ज्ञानयात्रा’ काढण्यात आली. यावेळी नरसी येथून मोटारसायकल रॅलीद्वारे ज्ञानज्योत चैतन्यस्थळी आणण्यात आली. गावोगावी शेकडो ग्रामस्थांनी या यात्रेचे स्वागत करून बाबांच्या कार्यास अभिवादन केले.
भव्य उद्घाटन सोहळा:दि. २९ मार्च रोजी बजरंग मैदान, सगरोळी येथे जन्मशताब्दी महोत्सवाचा भव्य शुभारंभ सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमाला प.पू. श्री आनंदराज माणिकप्रभू (श्री माणिकप्रभू संस्थान, माणिकनगर) यांच्या अध्यक्षतेखाली मान्यवरांची उपस्थिती होती. प्रमुख उपस्थित मान्यवरांमध्ये ष.ब्र. १०८ सद्गुरु श्री सिद्धदयाळ महाराज (शिवलिंग बादशहा मठ संस्थान, बेटमोगरा), प.पू. सद्गुरु श्री चंद्रशेखर महाराज देगलूरकर (सद्गुरु गुंडा महाराज मठ संस्थान, देगलूर), खासदार अशोकराव चव्हाण, स्वागताध्यक्ष आमदार जितेश अंतापूरकर आणि अनेक प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते. संस्थेचे चेअरमन प्रमोद देशमुख यांनी महोत्सवाच्या प्रस्ताविकेत वर्षभर होणाऱ्या विशेष कार्यक्रमांची माहिती दिली. गेल्या अनेक वर्षांपासून बाबांचा जन्मदिवस ‘संकल्प दिन’ म्हणून साजरा करण्याची परंपरा पाळली जाते. यानिमित्ताने संस्थेच्या सैनिकी विद्यालयाच्या मुखपत्र ‘क्षात्रतेज’ वार्षिकांकाचे विमोचन करण्यात आले. संतवचने आणि प्रेरणादायी विचार: ष.ब्र. १०८ सद्गुरु श्री सिद्धदयाळ महाराज बेटमोगरेकर आणि प.पू. सद्गुरु श्री चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांनी आपल्या मनोगतात संतवचनांचे दाखले देत कर्मयोगी बाबासाहेबांचे कार्य हेच आधुनिक काळातील संतसेवा असल्याचे प्रतिपादन केले. खासदार अशोकराव चव्हाण यांनी संस्थेच्या सामाजिक कार्याचे कौतुक करत, “प्रत्येक वेळी संस्थेत आलो की नवे आणि समाजाभिमुख उपक्रम सुरू झालेले पाहायला मिळतात,” असे गौरवोद्गार काढले. या ऐतिहासिक सोहळ्यात शेकडो ग्रामस्थ, विद्यार्थी आणि संस्थेचे कार्यकर्ते सहभागी झाले. जन्मशताब्दी वर्षानिमित्त होणाऱ्या पुढील कार्यक्रमांची उत्सुकता सर्वत्र आहे.


