भरत पुंजारा
ग्रामीण प्रतिनिधी पालघर
बऱ्हाणपूर, दि. २३ डिसेंबर २०२४: ग्रुप ग्रामपंचायत बऱ्हाणपूर, आंबेदे, सोमटा येथे ग्रामसभा मोठ्या उत्साहात पार पडली. या सभेचे आयोजन ग्रामसेवक श्री. बिपीन जाधव, सरपंच हर्षला पुंजारा, उपसरपंच प्रशांत तांबडा आणि ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. ग्रामसभेची सुरुवात मागील सभेच्या इतिवृत्ताच्या वाचनाने झाली. यानंतर सन २०२५-२६ साठीच्या अंदाजपत्रकाचे वाचन करण्यात आले. सभेत “आमचा गाव, आमचा विकास” या संकल्पनेवर आधारित सन २०२५-२६ साठी विकासकामांचे आराखडे सादर करण्यात आले. प्रमुख विषयांमध्ये वैयक्तिक लाभ योजनेतील लाभार्थी निवड, जन्म-मृत्यू व विवाह नोंदणी प्रक्रिया, वैयक्तिक वनहक्क दावे, वन जमीन गावठाण विस्तार प्रस्ताव, विटभट्टी परवानगी, वाढवण बंदर प्रकल्पासाठी भूसंपादन, जल जीवन मिशन, आरोग्य आणि शैक्षणिक विषयांवर चर्चा करण्यात आली.
ग्रामस्थांच्या मागणीनुसार अर्धवट प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे आश्वासन देण्यात आले. बऱ्हाणपूर पाटिलपाडा रस्त्याच्या विकासाविषयीही सविस्तर चर्चा झाली. या सभेला बऱ्हाणपूर, आंबेदे, सोमटा येथील ग्रामस्थ, महिला, शिक्षक, वैद्यकीय अधिकारी, अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामसभेने गावाच्या विकासासाठी एकसंघ प्रयत्न करण्याचा निर्धार केला.