भरत पुंजारा
ग्रामीण प्रतिनिधी पालघर
पालघर : जिल्ह्याच्या १२५ किलोमीटर लांबीच्या समुद्रकिनाऱ्यावर सागरी सुरक्षेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेतला जात आहे. झाई ते सफाळे दरम्यान १५ पोर्टा केबिन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून, लवकरच ही सेवा कार्यान्वित होणार असल्याची माहिती पोलीस विभागाने दिली आहे. जिल्ह्यात झाई, नरपड, आगर, धाकटी डहाणू, वाढवण, केळवे, सातपाटी आणि सफाळे या ठिकाणी १५ लँडिंग पॉइंट निश्चित करण्यात आले असून पोर्टा केबिन उभारणीची तयारी सुरू आहे. या पोर्टा केबिन पांढऱ्या रंगाच्या असून, पहिली पोर्टा केबिन सप्टेंबर महिन्यात नरपड समुद्रकिनारी ठेवण्यात आल्याची माहिती महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सचिन राऊत यांनी दिली. प्रत्येक पोर्टा केबिनमध्ये ३६० डिग्री सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत. या कॅमेर्यांद्वारे चित्रीकरणाचे थेट मॉनिटरिंग पोर्टा केबिन आणि पालघर पोलीस अधीक्षक कार्यालयातील कंट्रोल रूममधून करण्यात येणार आहे. सागरी हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी तैनात सुरक्षा रक्षक सक्रिय असतील. या उपाययोजनेमुळे सागरी सुरक्षेला नवीन आयाम प्राप्त होणार असून किनारी भागातील कोणत्याही घडामोडींवर त्वरित नियंत्रण मिळवणे शक्य होईल. यामुळे स्थानिक रहिवाशांना अधिक सुरक्षित वाटेल आणि जिल्ह्याच्या सागरी सुरक्षेला मोठा आधार मिळेल. पोलीस विभागाच्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत ही सेवा कार्यान्वित होईल. पोर्टा केबिन उभारणीसाठी प्रशासन आणि स्थानिक यंत्रणा एकत्रित काम करत असून ही योजना पालघर जिल्ह्यासाठी सागरी सुरक्षा वाढविण्याच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे.