संजय शिंदे
ग्रामीण प्रतिनिधी इंदापूर
शेतमालाच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारातील तीन हजार रुपयांच्या मुद्द्यावरून गुद्द्यावर आलेले भांडण एक जणाला चांगलेच महागात पडले. भिगवन पोलिसांकडे दाखल झालेल्या गुन्ह्यानुसार इंदापूर तालुक्यातील मदनवाडीत मक्याच्या व्यवहारावरून आरोपीने एकाच्या डोक्यात खोरे घातले व त्याला जखमी केले. सोमवारी सकाळी मदनवाडी गावातील घटना घडली. याप्रकरणी भिगवण पोलिसांनी सुंदर तुकाराम ढवळे (रा. मदनवाडी) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे या घटनेत महेश सुधीर कोकरे (वय 24 वर्ष रा. मदनवाडी ता. इंदापूर) हा जखमी झाला. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही मदनवाडी गावातीलच असून महेश कोकरे व सुंदर ढवळे या दोघांमध्ये मक्याचा व्यवहार झाला होता. त्यातील तीन हजार रुपये महेश कोकरेने दिले नाहीत. त्यामुळे सुंदर ढवळे हा पैसे मागत होता. यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर चिडलेल्या ढवळे याने कोकरे याच्या डोक्यात लोखंडी दांड्याचे खोरे घातले. या घटनेत महेश कोकरे हा जखमी झाला. घटनेचा पुढील तपास भिगवण पोलीस करत आहेत.


