राजेंद्र गायकर ग्रामीण प्रतिनिधी जुन्नर
जुन्नर:अण्णासाहेब वाघिरे कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय ओतूर येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून एड्स जनजागृती अभियान मंगळवार दि.३ डिसेंबर यशस्वीरित्या राबविण्यात आल्याची माहिती राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. निलेश काळे आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेंद्र अवघडे यांनी दिली.यावेळी डॉ. वसंत गावडे प्रमुख व्याख्याते म्हणून होते. डॉ.गावडे यांनी आपल्या व्याख्यानात जगात सगळ्यात पहिला एच.आय.व्ही. बाधित रुग्ण १९८१ साली अमेरिकेत आढळला आणि भारतामध्ये १९८६ साली मद्रास या ठिकाणी आढळून आला. महाराष्ट्रात मुंबई शहरात मे, १९८६ रोजी पहिला एड्स रुग्ण आढळला होता. ऑगस्ट, १९८७ मध्ये जेम्स. डब्ल्यू आणि थॉमस नेटर यांनी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन च्या जिनेव्हा येथील कार्यक्रमात एड्स दिनाच्या संदर्भातली संकल्पना मांडली. डॉ. मन यांच्या सहमती नंतर १ डिसेंबर, १९८८ पासून जागतिक एड्स दिन साजरा केला जाऊ लागला. एच.आय.व्ही. रुग्णाने आपले रक्त दुसऱ्या रुग्णाला किंवा व्यक्तीला दिल्याने, दूषित रक्त असलेली सुई, इंजेक्शन, एचआयव्ही बाधित आईकडून स्तनपान करताना होणाऱ्या मुलाला, असुरक्षित लैंगिक संबंधांमुळे हा जीवघेणा आजार होऊ शकतो. जास्त दिवस ताप येणे, जास्त दिवस खोकला येणे, विनाकारण वजन कमी होणे, तोंड येणे, भूक न लागणे अन्नावरची इच्छा कमी होणे, सतत जुलाब होणे, झोपताना सतत घाम येणे इत्यादी प्रामुख्याने आजाराची लक्षणे आहेत. त्याचबरोबर त्यांनी आपल्या व्याख्यानामध्ये या आजाराविषयी असलेले गैरसमज सांगितले हा आजार संसर्गजन्य नाही. बाधित रुग्णाच्या सोबत राहणे, जेवणे, खेळणे, स्पर्श करणे, त्याची कपडे वापरणे, त्याच्या बाजूला झोपणे, शौचालयाचा वापर करणे यामुळे हा आजार होत नाही. इत्यादी विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्याचबरोबर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेंद्र अवघडे यांनी जागतिक आरोग्य संघटनेने प्रकाशित केलेल्या आकडेवारीनुसार सुमारे ३ कोटी ६७ लाख लोक एच.आय.व्ही. सह जगत आहेत. एच.आय.व्ही. शरीरातील द्रव पदार्थांच्या थेट हस्तांतरणाद्वारे प्रसारित होतो. उदाहरणार्थ रक्त , संक्रमित आईचे दूध, वीर्य. त्याचबरोबर ड्रग्स वापरकर्त्यांमध्ये सुया, इंजेक्शन याद्वारे एच.आय.व्ही.चा प्रसार वारंवार होत असतो. त्याचबरोबर असुरक्षित लैंगिक संबंधांद्वारे याचे प्रसारणाचे प्रमाण हे सर्वाधिक आहे. लैंगिक संबंध प्रस्थापित करताना काळजी घेणे गरजेचे आहे. राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने या आजाराच्या तीव्रतेबाबत जनजागृती अभियान राबवण्यात आले हा एक विधायक उपक्रम असून या उपक्रमाद्वारे या आजाराविषयी असलेले गैरसमज दूर होण्यास नक्कीच मदत होईल. त्याचबरोबर लोकांमध्ये जनजागृती निर्माण होऊन या जीवघेण्या आजाराचा प्रसार रोखण्यास हातभार लागेल. याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी उपप्राचार्य डॉ. के. डी. सोनावणे, प्राध्यापकडॉ. ए. टी. पाडवी, हिंदी विभाग प्रमुख राजेंद्र रसाळ, रमेश काशिदे, रमाकांत कसपटे आदी प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. निलेश काळे यांनी तर सूत्रसंचालन विनायक कुंडलिक यांनी तर आभार प्रदर्शन राजेंद्र अंबावणे यांनी केले. सदर कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी सुवर्णा डुंबरे आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष सहकार्य केले.