संजय शिंदे
ग्रामीण प्रतिनिधी इंदापूर
आयसीए जागतिक सहकार परिषद 2024 मुळे जगातील व देशातील सहकार क्षेत्राच्या विकासास चालना मिळणार आहे. स्वातंत्र्योत्तर काळानंतर देशाच्या विकासामध्ये सहकारी संस्थांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे, असे मत राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बुधवारी (दि.27) व्यक्त केले. नवी दिल्ली येथे आयसीए जागतिक सहकार परिषद-2024 चे सोमवार दि. 25 नोव्हेंबर पासून आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेमध्ये बुधवारी (दि.27) हर्षवर्धन पाटील यांनी सहभाग घेतला. यावेळी या सहकार परिषदे संदर्भात हर्षवर्धन पाटील यांनी वरील मत व्यक्त केले. जागतिक सहकारी चळवळीची प्रमुख संस्था असलेल्या आंतरराष्ट्रीय सहकारी आघाडीच्या (आयसीए) 130 वर्षाच्या इतिहासामध्ये ही परिषद प्रथमच भारतात होत आहे.सहकार सर्वांसाठी समृद्धी निर्माण करतात,” ही या सहकार चळवळीची थीम आहे. संयुक्त राष्ट्रांनी सन 2025 वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केले आहे, अशी माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली. या सहकार परिषदेचे सोमवारी (दि.25) पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. या सहकार परिषदेत चर्चा, पॅनेल सत्रे आणि कार्यशाळा संपन्न झाल्या. तर समारोप समारंभ 27 नोव्हेंबर रोजी सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे उपस्थितीत संपन्न झाला. या परिषदेस जगातील 100 हून अधिक देशांमधील सुमारे 3000 प्रतिनिधींनी सहभाग घेतला, अशी माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली.