संजय शिंदे ग्रामीण प्रतिनिधी इंदापूर
इंदापूर तालुक्यातील महात्मा फुलेनगर (बिजवडी ) येथील कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना व शहाजीनगर येथील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याकडून गळीत हंगाम सन 2023-24 साठी ऊस बिलाचा दिवाळीसाठी प्रति टन रु. 200 प्रमाणे हप्ता हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आज मंगळवारी (दि.22) वर्ग करण्यात आला आहे, अशी माहिती कर्मयोगी शंकररावजी पाटील कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील व निरा भिमा कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार यांनी इंदापूर येथे मंगळवारी (दि.22) दिली. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे नेतृत्वाखाली हे दोन्ही कारखाने उत्कृष्टरित्या कार्यरत आहेत. या दोन्ही कारखान्यांनी यापूर्वी शेतकऱ्यांना रु. 2700 प्रमाणे ऊस बिलाची रक्कम वेळेवरती अदा केलेली आहे. कर्मयोगी शंकररावजी पाटील व निरा भिमा कारखान्याच्या संचालक मंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांना ऊस बिलाचा दिपावलीसाठी रु. 200 प्रमाणे हप्ता देण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती राजवर्धन पाटील व लालासाहेब पवार यांनी दिली.तसेच या दोन्ही कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना एक महिन्याचा पगार बोनस म्हणून दिवाळीसाठी देण्यात येणार आहे. आगामी सन 2024-25 च्या गळीत हंगामासाठी दोन्ही कारखाने सज्ज झाले आहेत. आगामी गळीत हंगाम यशस्वी करणेसाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही याप्रसंगी त्यांनी केले.या दोन्ही कारखान्यांमध्ये कामगारांचे पगार नियमितपणे होत आहेत, मात्र गैरसमज निर्माण केला जातो, कारखान्याचे बदनामी केली जात आहे. कारखान्या संदर्भात चुकीच्या गोष्टी करू नका, या संस्था शेतकऱ्यांच्या आहेत, असे आवाहन यावेळी राजवर्धन पाटील यांनी केले. याप्रसंगी नीरा भीमा कारखान्याचे संचालक विलासराव वाघमोडे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी दोन्ही कारखान्याचे संचालक मंडळ, कार्यकारी संचालक उपस्थित होते.








