सुमेध दामधर ग्रामीण प्रतिनिधी संग्रामपूर
सोनाळा :- दि.२१ ऑगस्ट २०२४ रोजी शेगांव येथील शासकीय विश्रामगृहात जळगांव जामोद विधानसभा मतदारसंघातील बहुजन मुक्ती पार्टीचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांची महत्त्वपुर्ण बैठक बोलावण्यात आली होती. ही बैठक पक्षाचे प्रदेश अध्यक्ष श्रीकांत होवाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत राष्ट्रीय ओबीसी वर्ग मोर्चाचे अरविंद पाटील मानखैर, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे शेख निसार शेख इमाम, बुद्धिष्ट इंटरनॅशनल नेटवर्क च्या संध्या हिवाळे, संगिता मोहोळ, जगदीश कोकाटे. भारत मुक्ती मोर्चाचे महेंद्र गवई, भारतीय युवा मोर्चाचे विशाल इंगळे, प्रविण इंगळे, राष्ट्रीय गुरू रविदास मोर्चाचे योगेश पानझडे, दिपक भटकर या विविध सामाजिक संघटनाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बहुजन मुक्ती पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी यांची ही बैठक जळगांव जामोद विधानसभा निवडणूक २०२४ करिता पार पडली. या बैठकीत सुजित बांगर यांच्या उमेदवारीचा प्रस्ताव बहुजन मुक्ती पार्टीचे युवा जिल्हा अध्यक्ष सागर मोरे यांनी ठेवला असता, अरविंद मानखैर पाटील व शेख निसार शेख इमाम यांनी ठेवलेल्या प्रस्तावाला अनुमोदन दिले आणि पक्षाचे प्रदेश अध्यक्ष श्रीकांत होवाळ यांनी अध्यक्षीय भाषणात बोलत असताना सुजित बांगर यांच्या कार्याची दखल घेत जळगांव जामोद विधानसभा मतदारसंघासाठी सुजित बांगर यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली. यावेळी उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात सर्वानुमते सहमती दर्शवली. मनोगत व्यक्त करताना अरविंद पाटील बोलत होते की, “मराठा कुणबी समाजाचे हक्क अधिकार वाचवण्यासाठी रस्त्यावरची आंदोलनं करणारा सर्व सामान्य परिवारातील निर्भीड तरूण युवा पिढीला प्रेरणा देणारे त्यागी समर्पित युवा नेतृत्व सुजित भाऊ बांगर यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केल्यामुळे मनस्वी आनंद होत आहे आम्हीं सर्व शक्तिनिशी सोबत आहोत.” मुस्लिम समाजाच्या सुखदुःखात धावून येणारे सुजित भाऊ बांगर यांची उमेदवारी जळगांव जामोद विधानसभा मतदारसंघातून निश्चित झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन व राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा संघटीत ताकदीनं त्यांच्या सोबत राहणार असल्याचे शेख निसार शेख इमाम यांनी जाहीर केले. भोन येथील मौर्यकालिन बुद्ध स्तूप वाचवण्यासाठी निरंतर रस्त्यावरच्या आंदोलनाचे नेतृत्व करणारे बांगर साहेब यांचा रस्त्यावरचा आवाज विधानसभेत पाठवण्यासाठी आम्हीं संघटीत शक्तीने सोबत आहोत. असे जगदीश कोकाटे जिल्हा कार्याध्यक्ष बुद्धिष्ट इंटरनॅशनल नेटवर्क बुलढाणा यांनी म्हटले आहे. युवकांच्या व विद्यार्थ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी खंबीरपणे उभे राहणारे युवा नेते बांगर साहेब यांना जळगांव जामोद विधानसभा मधून उमेदवारी जाहीर करण्यात आली त्यामुळे भारतीय युवा मोर्चा त्यांच्या सोबत आहे. असे प्रतिपादन विशाल इंगळे यांनी केले. महिलांवर होणाऱ्या अन्याय अत्याचारांच्या विरोधात निरंतर निर्णायक भूमिका निभावणारे सर्व सामान्य कुटुंबात जन्मलेल निर्भीड तरूण नेतृत्व सुजित दादा बांगर यांच्या सोबत आहोत. अशी ग्वाही संध्या हिवाळे यांनी दिली.अगदी विद्यार्थी दशेपासून बहुजन समाजाचे हक्क अधिकार वाचवण्यासाठी रस्त्यावरचा संघर्ष करणारे व प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होणारे इमानदारीने समाज कार्य करीत असणारा सामान्य कुटुंबात जन्मलेल्या शेत मजुराच्या मुलाला विधानसभेत पाठवण्यासाठी आज या बैठकीत सविस्तर चर्चा करुन सर्वानुमते जळगांव जामोद विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी बहुजन मुक्ती पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर केल्यामुळे सर्वच स्तरांतून अभिनंदन केले जात आहे. यावेळी बहुजन मुक्ती पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी व विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.