गजानन डाबेराव ग्रामीण प्रतिनिधी नांदुरा
नांदुरा :- नांदुरा तालुक्यातील शेलगाव मुकुंद येथील योगेश पुंजाजी वेरुळकर वय ३५ वर्ष या युवा शेतकरी पुत्राने दि.२१ ऑगस्ट २०२४ रोजी फवारणीसाठी आणलेले विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली आहे.या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.सदर युवा शेतकरी यांच्या वडिलांच्या नावे स्टेट बँक नांदुरा चे एक लाख साठ हजार रुपयाचे थकित कर्ज असून सततच्या कर्जापायी शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचे समजत आहे. कर्जापायी आत्महत्या केलेल्या योगेश पूंजाजी वेरुळकर यांच्या वडिलाचे नावे शेलगाव मुकुंद येथे कोरडवाहू ६ एकर शेती असून त्यांनी शेतीसाठी १ लाख ६० रुपयाचे पीक कर्ज नांदुरा येथील स्टेट बँकेच्या माध्यमातून घेतले असून ते थकित झाले आहे.कोरडवाहू शेती त्यातच संसाराचा गाडा हाकताना होणारी परवड व पिककर्जाचा वाढता बोजा यामुळे या शेतकरी पुत्राने आत्महत्या केली आहे .सदर शेतकरी पुत्राला एक मोठा भाऊ,आई वडील व विवाहित बहिण आहे.











