जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रासाठी मदतीचे आश्वासन
दिनानाथ पाटील तालुका प्रतिनिधी शहादा
शहादा (प्रतिनिधी) : सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील युवा खेळाडूंसाठी विशेष प्रयत्न करणार. तसेच परिसरातील शेती सिंचनाखाली यावी यासाठी बॅरेजेसमधील पाण्याचा प्रश्न मार्गी लावून शेतकरी हिताची जपणूक करणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री ना. रक्षाताई खडसे यांनी केले. शहादा येथील अन्नपूर्णा लॉन्स येथे रावेर मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा निवडून आलेल्या खासदार तथा केंद्रीय युवक क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांचा जय सरदार पटेल फाउंडेशन व विहाना फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित नागरी सत्कार करण्यात आला. त्यावेळी मनोगत व्यक्त करतांना त्या बोलत होत्या. कार्यक्रमास आलेल्या केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी प्रथम शहरातील सरदार वल्लभभाई पटेल, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यावर पुष्पहार अर्पण केले. यावेळी सरदार पटेल चौकात महिलांनी त्यांचे औक्षण केले. सोहळा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे प्रदेश सदस्य दीपकभाई पाटील होते. यावेळी आदिवासी विकास मंत्री ना.डॉ. विजयकुमार गावित, आ. राजेश पाडवी, आ. आमश्या पाडवी, माजी खासदार डॉ. हिना गावित, भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी, माजी नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्रा. मकरंद पाटील, माजी व्हाईस चेअरमन जगदीश पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजीत पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विभागीय अध्यक्ष घनश्याम चौधरी, दक्षिण गुजरात भाजपचे अध्यक्ष महेंद्र पटेल, सहकार भारतीचे तापी जिल्हा अध्यक्ष मनीलाल पाटील, पानसेमलचे माजी नगराध्यक्ष लोकेश शुक्ल, पंचायत समिती सभापती विनोद वसावे, माजी नगरसेवक महेश घोल यांच्यासह जिल्ह्यातील आणि मध्यप्रदेश व गुजरात राज्यातील शेकडो नागरिक उपस्थित होते. यावेळी बोलतांना केंद्रीय राज्यमंत्री खडसे म्हणाल्या, माझी केंद्रीय मंत्रिमंडळातील निवड हा परिसराचा म्हणजे माझ्या माहेरचा सन्मान आहे. सत्कार समारंभात सर्वच पक्षीय व सर्वच समाजातील मान्यवरांची उपस्थिती माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष येत असतो. मात्र प्रामाणिकपणे कार्य केल्यास यश प्राप्ती होते. प्राप्त झालेल्या संधीचे समाज हित जपण्यासाठी उपयोग करणे खरी सेवा आहे. राजकीय जीवनात यशापावेतो पोहोचण्यासाठी मतदार सोबत असणे आवश्यक आहे. मंत्रीपदाच्या माध्यमातून जनसेवा करत मतदारांच्या अपेक्षा पूर्ण करू असेही त्यांनी सांगितले. यावेळी आमदार पाडवी, माजी खासदार डॉ गावित, मंत्री ना.डॉ. गावित, विजय चौधरी, घनश्याम चौधरी, अभिजीत पाटील, राजा साळी यांचीही भाषणे झाली. विहाना फाऊंडेशन च्या सचिव मोनालिसा पाटील यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रा.डॉ. विजयप्रकाश शर्मा यांनी केले. आभार डॉ. प्रियांक पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सरदार पटेल फाउंडेशन व विहाना फाउंडेशनच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.











