दिनानाथ पाटील तालुका प्रतिनिधी शहादा
शहादा : नंदुरबार जिल्ह्याच्या शहादा तालुक्यातील पाडळदा ते बुडीगव्हाण गावा दरम्यान रस्त्याच्या बाजूला महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाकडून शालेय पोषण आहारात विद्यार्थ्यांना देण्यासाठी पुरविण्यात आलेल्या मिलेट्स चॉकलेट बार फेकलेल्या अवस्थेत आढळून आल्या. सदरचे चॉकलेट्स मुदतबाह्य असल्याची चर्चा आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शाळांना मुदतबाह्य मिलेट्स चॉकलेट बारचा पुरवठा झाला असल्याचे स्पष्ट होते. अश्या चॉकलेट बारचा पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराची चौकशी होणे आवश्यक आहे. शिक्षण विभागाच्या साखर झोपेतील कारभारामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य वेठिला धरले जात आहे. शालेय विद्यार्थ्यांना जीवनसत्त्वची कमतरता भासू नये यासोबत त्यांना पूरक पोषण आहार मिळावे यासाठी शिक्षण विभागाने दररोज शालेय पोषण आहारात मिलेट्स चॉकलेट्स बारचे वाटप करण्याचे आदेश दिला आहेत. मात्र, काही शाळांमध्ये शिक्षकांनी आदेशाला न जुमानता चॉकलेट वाटप केले नसल्याने चॉकलेटची कालबाह्य मुदत संपली असावी किंवा ठेकेदाराने कालबाह्य चॉकलेटचा पुरवठा केला असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. एकीकडे जिल्ह्यात कुपोषण कमी करण्यासाठी शासनाकडून विविध उपाय योजना राबविल्या जात आहेत आणि दुसरीकडे शालेय पोषण आहारात देण्यात येणारे मिलेट्स बार चॉकलेट्स रस्त्यावर फेकले जात आहेत. जिल्ह्यातील शहादा तालुक्याच्या पाडळदा ते बुडीगव्हाण रस्त्या लगत मिलेट्स बार चॉकलेट्स फेकल्याचे चित्र समोर आले आहे. सदरचे चॉकलेट्स कालबाह्य असल्याची चर्चा परिसरात आहे. शिक्षण विभागाने या घटनेची सखोल व पारदर्शक चौकशी करून जर मुदतबाह्य चॉकलेट्सचा पुरवठा करण्यात आला असेल तर तो पुरवठा करणारा ठेकेदार किंवा संबंधित शिक्षक यापैकी जो कोणी दोषी असेल त्यांच्या विरोधात कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे. दरम्यान गटशिक्षणाधिकारी डॉ. योगेश साळवे यांनी याबाबत शहादा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तीत अज्ञातांनी दि. 14 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान शासकीय पोषण आहारात विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मिलेट्स चॉकलेट रस्त्यावर फेकल्याने शासनाचे नुकसान केल्याचे नमूद केले आहे.











