मारोती बारसागडे तालुका प्रतिनिधी चामोर्शी
चामोर्शीः – प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेंतर्गत मिलेट न्युट्रीटीव्ह बार हे जस्ट युनिव्हर्सल प्रायव्हेट लिमिटेड कडून शहीद बाबुराव शेडमाके माध्यमिक विद्यालय आमगाव (म ) ता. चामोर्शी जिल्हा गडचिरोली येथे पाठविण्यात आलेल्या बार (चाकलेट ) मध्ये अळ्या सापडल्याने शालेय व्यवस्थापन आणि शालेय विद्यार्थी पुरते धास्तवलेले आहेत . जस्ट युनिव्हर्सल प्रायव्हेट लिमिटेड कापसी बुद्रूक ता . कामठी जि . नागपूर यांचे कडून दिनांक 13.08 . 2024 ला पाठविण्यात आलेल्या चॉकलेट मिलेट न्युट्रीटीव्ह बार विथ रागी (30 ग्रॅम प्रती ) बार मध्ये अळ्या सापडल्याने अशा निकृष्ट दर्जाचे चॉकलेट द्यायचे कुणाला ? आरोग्य धोक्यात घालायचे कसे ? हा यक्षप्रश्न शालेय प्रशासनासमोर निर्माण झालेला आहे . शासनातर्फे ह्या योजना आरोग्य सुधारण्यासाठी की आरोग्य धोक्यात घालण्यासाठी याचा उलगडा होणे गरजेचे असल्याने अशा चॉकलेटबार वर व चॉकलेटच्या कंपनीची कसून चौकशी करून उचित कार्यवाही करण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे . याआधी सुद्धा अशाच प्रकारच्या चॉकलेट मध्ये अळ्या सापडल्याचे अनेक व्हिडिओ / फोटो प्रसारित झालेले आहे परंतु शासनाने मात्र याकडे दुर्लक्ष करून चिमुकल्या जीवाची कोणतीही पर्वा न करता आरोग्य धोक्यात घालण्याचे काम करत असल्याचे निदर्शनास येत आहे . त्यामुळे अशा निकृष्ट दर्जाच्या चाकलेट वर कायमची बंदी घालण्यात यावी असा जण – माणसांमध्ये आक्रोश निर्माण झालेला आहे .