विजयकुमार गायकवाड तालुका प्रतिनिधी इंदापुर
इंदापूर: पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील भिगवण जवळील मदनवाडी( ता.इंदापुर) येथील उड्डाण पुलाखालील राज्यमाता अहिल्यादेवी चौकात घाणीचे साम्राज्य पसरले असून त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. मदनवाडी चौकातून पश्चिम बाजूला बारामती कडे जाण्यासाठी व पूर्व बाजूला राशीनला जाण्यासाठी प्रवाशांची सातत्याने वर्दळ आसते.तसेच उड्डाण पुलाखाली मालवाहतूक करणाऱ्या वाहनांचे वाहनतळ असल्याने सातत्याने या ठिकाणी वाहन चालकांची गर्दी असते परंतु येथे शौचालयाची सोय नसल्याने पुलाखालीच उघड्यावरच नागरिक, प्रवासी व वाहनचालक लघुशंका करतात त्यामुळे या ठिकाणी फार मोठी दुर्गंधी व डासांचे साम्राज्य पसरले आहे. याकडे मदनवाडी ग्रामपंचायतने ताबडतोब लक्ष देऊन या ठिकाणी साफसफाई करून जंतुनाशक फवारणी करावी तसेच या ठिकाणी कायमस्वरूपी शौचालय बांधावे अशा प्रकारची मागणी येथील नागरिक करीत आहेत. याबाबत येथील सरपंच प्रतिनिधी मारूती बंडगर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की आम्ही ग्रामपंचायतीच्या मार्फत वारंवार स्वच्छता करीत आहोत तसेच पुलाखाली शौचालय बांधण्याची आमची तयारी आहे परंतु शौचालय बांधण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाकडून परवानगी मिळत नाही.