दिनानाथ पाटील तालुका प्रतिनिधी शहादा
शहादा, ता. 18 : ढगफुटी सदृश आलेल्या पावसाचे पाणी न्यायालयात शिरल्याची माहिती मिळताच नंदुरबार प्रमुख जिल्हा न्यायाधीश ए. एन. करमरकर यांनी शहादा न्यायालयात भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. वारंवार पावसाचे पाणी शिरल्याने होणाऱ्या त्रासामुळे प्रशासकिय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. दि. 16 जुलै रोजी शहादा शहर व तालुक्यात तसेच परिसरात रात्रीच्या सुमारास मुसळधार पाऊस झाल्याने कवळीथ व डोंगरगाव परिसरातील के.टी. वेअर बंधाऱ्याचे पाणी पाटचारीत आल्याने काही धनाढ्य अतिक्रमधारकांनी पाटचाऱ्याच बंद केल्या तर काहींनी पाटचाऱ्यांचा प्रवाह बदलून दिला तर शहरी भागातून वाहणाऱ्या पाटचाऱ्यांमध्ये निमुळते पाईप टाकुन अतिक्रमण करून व्यवसाय थाटले आहेत. त्यामुळे पाटचाऱ्या बंद झाल्याने तसेच नगर पालिका शहरातुन जाणाऱ्या पाटचाऱ्यांची सफाई योग्य पद्धतीने होत नसल्यामुळे दर वर्षी पाटचारीचे पाणी गावात शिरून शहराला जलाशयाचे स्वरुप प्राप्त होते. प्रमुख जिल्हा न्यायाधीश ए. एन. करमरकर यांनी न्यायालयाच्या कोर्ट हॉलमध्ये बैठक घेतली. यात सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रभाकर वळवी, तहसीलदार दीपक गिरासे, शहादा नगरपालिकेचे मुख्याधिकारी दिनेश शिनारे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता प्रणव पाटील, वीज वितरण कंपनीचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत पावसाचे पाणी वारंवारन्यायालयात शिरल्याच्या घटना घडत आहेत, त्यामुळे होणाऱ्या त्रासाबाबत कायमस्वरूपी उपायोजना करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी दिवाणी वरिष्ठ न्यायालयाचे न्यायाधीश बी. एन. आरबाड, न्यायमूर्ती यु. एन. पाटील, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी वी. वी. निवघेकर, एम. बी. पाटील, श्रीमती एस आर पाटील, वकील संघाचे अध्यक्ष विजय चव्हाण, उपाध्यक्ष अमोल गुलाले, जिल्हा सरकारी वकील विनोद गोसावी व न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते. याबाबत वकील संघाचे उपाध्यक्ष अमोल गुलाले यांच्या अध्यक्षतेखाली वकील संघाच्या कार्यालयात बैठक होऊन उद्या तहसीलदार दीपक गिरासे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी दिनेश सिनारे व सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रभाकर वळवी यांना निवेदन देण्यात येणार आहे.


