सतिश गवई तालुका प्रतिनिधी उरण
उरण : यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथे उरण, पेण, पनवेल, तालुक्यातील मे. मुंबई इंटिग्रेटेड एस ई झेड लि. या कंपनीला मुंबई कुळवहिवाट आणि शेतजमीन अधिनियम १९४८ चे कलम ६३/१अ अनुसार विशेष आर्थिक क्षेत्र ( सेझ) स्थापन करण्याकरिता दिलेल्या मे. विकास आयुक्त (उद्योग) मुंबई यांचे परवानगी आदेशाचे कलम १ प्रमाणे शेतकऱ्यांना जमीन मिळकती मूळ किंमतीस परत करण्याबाबत सरकारने आदेश दिले होते. परंतु अद्यापपर्यंत त्यांची कोणतेही अंमलबजावणी झाली नाही.याबाबत सेझग्रस्त शेतकरी चळवळ संघटना यांनी सरकार दरबारी वारंवार पाठपुरावा करून सुध्दा शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही. म्हणून शेतकऱ्यांच्या प्रमुख शिष्टमंडळाने महिला प्रदेश सरचिटणीस भावना घाणेकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक तथा राष्ट्रीय नेते शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी शरद पवार यांनी शेतकऱ्यांना जमिनी परत मिळवून देण्याबाबत आपण सरकार दरबारी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे महिला प्रदेश सरचिटणीस भावना घाणेकर, कोकण विभाग युवक अध्यक्ष प्रमोद बागल, उरण तालुका विधानसभा अध्यक्ष ऍड. दत्तात्रेय नवाले, उपस्थित होते.


