दिनानाथ पाटील तालुका प्रतिनिधी शहादा
शहादा, ता. 12: शहादा तालुक्यातील मुबारकपूर येथील अंगणवाडीत लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात अळ्या आढळून आल्या. त्यामुळे तालुक्यात खराब पोषण आहार पुरवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. गावाच्या महिला सरपंचांनी पुढाकार घेत अळी युक्त पोषण आहार समोर आणून बालविकास प्रकल्प अधिकाऱ्याची बोलती बंद केली. अंगणवाडीतील पोषण आहारातील अळ्या पाहून पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मुबारकपूर येथील अंगणवाडीत बालकांना पोषण आहार देण्यात आला होता. परंतु, त्या पोषण आहारात अळ्या असल्याचे समोर आले. याची माहिती मिळाल्याबरोबर सरपंच ताईबाई राजेंद्र आहेर यांनी अंगणवाडीत धाव घेत पोषण आहाराची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर त्यांनी थेट म्हसावद गटाचे बालविकास प्रकल्प अधिकाऱ्याशी संपर्क साधून अंगणवाडीतील प्रकारची माहिती दिली. एकात्मिक बाल विकास योजना मंडळ अंतर्गत या आहाराचे वाटप करण्यात आले होते. धक्कादायक बाब म्हणजे अंगणवाडी मदतनीस महिलेने अळ्या असलेला हाच पोषण आहार शिजविण्यासाठी घेतला होता. मात्र त्यांनी आहारात निरखून पाहिले असता त्यामध्ये त्यांना अळी आढळून आल्या. याची माहिती पालकांना मिळताच त्यांनी अंगणवाडीत धाव घेत महिती घेत संताप व्यक्त करीत ठेकेदारा विरोधात कठोर कारवाईची मागणी केली. दरम्यान, पोषण आहाराबाबत यापूर्वीही तक्रारी असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. शहादा तालुक्यात इतर भागातील आहार तपासण्याची मागणी यावेळी करण्यात आली. नंदुरबार जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांना पोषण आहार ठेवण्यासाठी योग्य दर्जाचे साहित्य नसल्याचा दावा केला जात आहे. यात कोठ्या देण्याची मागणी आहे. परंतू अद्यापही कोठ्या मिळाल्या नसल्याची माहिती दिली गेली. पावसाळ्यात अळ्या पडण्याची प्रक्रिया घडत असल्याने हा पोषण आहार किती दिवस कसा आणि कुठे साठवून ठेवावा याबाबत योग्य त्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. याबाबत म्हसावद गटाचे बाल विकास प्रकल्प अधिकारी फारुख शेख यांनी सध्या पावसाचे दिवस आहेत त्यामुळे अंगणवाडीत पोषण आहार ठेवण्याकरिता कोठ्या नसल्याने पोषण आहारात अळ्या पडल्या आहेत. याबाबत संबंधित आशा सेविकांना स्वच्छ करण्याच्या सूचना दिल्या असून उर्वरित पोषण आहार व्यवस्थितरीत्या ठेवण्यात येईल असे सांगितले. तर लहान बालकांच्या आरोग्याशी खेळण्याचा हा प्रकार असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन चौकशी करून कारवाई करण्याची गरज आहे. पालक मुलांना अंगणवाडीत चांगल्या हेतूने पाठवतात. पोषण आहाराचा पुरवठा करताना आहार योग्य आहे किंवा कसे याची पडताळणी आवश्यक असल्याचे मुबारकपूरच्या सरपंच ताईबाई आहेर यांनी सांगितले.


