दिनानाथ पाटील
तालुका प्रतिनिधी शहादा
शहादा, ता. 04 : शहादा तालुक्यातील शहाणा मालकातर रस्त्यावर राज्य उत्पादक शुल्क विभागाच्या पथकाने बिअरची वाहतूक करणाऱ्या बोलोरो पिकप गाडीसह सुमारे आठ लाख रुपये किमतीचा बियरच्या मद्यसाठ्या विरोधात धडक कारवाई केली. तसेच संशयितालाही ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईमुळे अवैधरित्या मद्यसाठा विक्रेत्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. नंदुरबार राज्य उत्पादन शुल्क विभाग व भरारी पथक यांच्या निरीक्षकांनी शहाणा- मालकातर रस्त्यावर शहाणा शिवारात मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचला. या कारवाईत चार चाकी (क्र.एमएच 18 बीजी 3093) वाहनात राज्यात प्रतिबंधित व मध्यप्रदेश राज्यात निर्मित व फक्त तेथे विक्रीस ग्राह्य असलेली पावर कुल सुपर स्ट्राँग बिअरचे 100 बॉक्स, प्रत्येक बॉक्स मध्ये 500 मि.लि. क्षमतेच्या 24 बिअर कॅन व प्रत्येक कॅनची छापील किमत 115 रुपये असे एकूण 2400 बिअर कॅन व महिंद्रा बोलेरो पिकअप गाडी असा एकूण 7 लाख 76 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. त्यात निव्वळ 2 लाख 76 हजार रुपये किमतीची बिअर आहे. सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्कचे डॉ. विजयकुमार सूर्यवंशी, अंमलबजावणी व दक्षता विभागाचे संचालक पी. पी. सुर्वे, नाशिकच्या विभागीय उपायुक्त श्रीमती उषा वर्मा, अधीक्षक श्रीमती स्नेहा सराफ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सदर कारवाई नंदुरबार येथील उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक बी. एस. महाडीक, भरारी पथकाचे निरीक्षक व्ही. ए. चौरे, दुय्यम निरीक्षक अमित शांतीलल गायकवाड, पी. व्ही. मोर, एम. के. पवार यांच्यासह जवान बी. एम. चौधरी, संजय बैसाणे, एम. एन. पाडवी व धनराज पाटील यांनी केली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास नंदुरबार येथील राज्य उत्पादन शुल्क ब विभागाचे दुय्यम निरीक्षक अमित गायकवाड करत आहेत. दरम्यान, लोकसभा निवडणुक काळातील कारवाईमुळे थंडावली दारूची चोरटी वाहतूक काही दिवसांपासून अवैध मद्यसाठ्याची वाहतुकीचे प्रकार पुन्हा वाढले आहेत. राज्य उत्पादन शुल्क व पोलिस विभागांकडून झालेल्या या कारवाईने ते अधोरेखित झाले आहे. मात्र याच मार्गाने मध्यरात्रीनंतर नेहमी होत असलेल्या दारूच्या चोरट्या वाहतुकीला पायबंद दर तीन चार दिवसाआड तपासणी करण्याची आवश्यकता आहे.