दिनानाथ पाटील तालुका प्रतिनिधी शहादा
शहादा, ता. 01 : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेपासून लाभार्थी वंचित वंचित राहू नये यासाठी महाराष्ट्र राज्याचा अधिवास आणि जन्म दाखल्याची अट शिथिल करावी अशी मागणी शहादा विधानसभेचे आमदार राजेश पाडवी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि महिला बालविकास मंत्री आदितीजी तटकरे यांचेकडे केली आहे. दरम्यान,या मागणीचा तत्वतः विचार करून हमीपत्राद्वारे पात्रतेची अधिसूचना काढण्याचे आश्वासन मंत्री महोदयांनी दिले आहे. आमदार राजेश पाडवी यांनी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस आणि महिला व बालविकास मंत्री श्रीमती तटकरे यांना प्रत्यक्ष दिलेले निवेदन असे, 28 जून 2024 रोजी राज्याच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील 21 ते 60 वयोगटातील महिलांसाठी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरू करण्यात आली. या योजनेचे संपूर्ण महाराष्ट्रभरात स्वागत होत आहे. मात्र, नंदुरबार जिल्ह्यातील बहुतांश भाग मध्यप्रदेश व गुजरात सीमेला लागून असल्याने जिल्ह्यातील अनेकांची सोयरीक ही मध्यप्रदेश किंवा गुजरात राज्यातून झालेली आहे. अशा महिलांचे वास्तव्य आज जरी महाराष्ट्रात असली तरी केवळ माहेर किंवा जन्म गुजरात आणि मध्यप्रदेश राज्यातील गावांतील असल्यामुळे त्यांना या योजनेची पात्रता अट क्रमांक तीन “महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र तथा जन्मदाखला” नसल्याने या महत्त्वाकांशी योजनेचे लाभार्थी होण्यासाठी त्यांना अडचण निर्माण होत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणावर लाभार्थी या योजनेपासून वंचित वंचित राहू नये यासाठी महाराष्ट्र राज्याचा अधिवास / जन्म दाखला या प्रमाणपत्राची अट शिथिल करण्याबाबत विचार करण्याचे पत्रात शेवटी नमूद केले आहे. आमदार पाडवी यांच्या मागणीचा तत्वतः विचार करत उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि महिला व बालविकास मंत्री अदितीजी तटकरे यांनी या योजनेत असलेली जन्म व अधिवास या अटी शिथिल करण्याची तत्त्वता शक्यता वर्तवली आहे. तसेच या योजनेअंतर्गत 21 ते 60 या वयाचा महिलांसाठी हमीपत्राद्वारे पात्रता करता येईल. तसेच याबाबत लवकरच अधिकृत अधिसूचना काढून निर्णय घेण्यात येईल असे आमदार पाडवी यांना आश्वासित केले आहे.