दिनानाथ पाटील तालुका प्रतिनिधी शहादा
शहादा, ता. 25: मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्ष व महाराष्ट्र राज्य शेतमजुर युनियन (लालबावटा) शहादा तालुका कमिटी यांचे वतीने विविध मागण्यांसाठी आज दि. 25 जूनला मोर्चा काढण्यात आला. राज्य व केंद्र शासनाने गायरान पडीत जमीन आणि वनअधिकार कायदा या दोन्ही कायद्याची अंमलबजावनी न करता ज्या भुमिहीन नागरिक या जमीनी कसत आहेत त्यांना शासनामार्फत नोटीसा देण्यात येत आहेत. तसेच बेघर लोक गायरान व पडीक जमीनीवर घरे बांधुन राहत आहेत त्यांनाही अतिक्रमण काढण्याचा नोटीसा देण्यात आल्या आहेत. राज्य शासनाने वृध्दपकाळ योजनेची रक्कम 1000 वरुन 1500 रुपये देण्याचे जाहीर केले असतांना अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही. या उलट दरमहा 1000 मिळण्याऐवजी दोन ते तीन महिने पेन्शन मिळत नाही. यासह संजय गांधी, श्रावणबाळ योजनेची आदीं योजनेत मुले सज्ञान असल्याचा बहाणा करुन त्यांना पेन्शन पासुन वंचित ठेवण्याचा प्रकार सुरू आहे. भूमिहीन शेतमजुर, अल्पभुधारक व दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना राज्य शासनाच्या स्वस्त धान्य दुकाना मार्फत दरमहा 35 किलो धान्य देण्याएवेजी मानसी फक्त 5 किलो धान्य दिले जाते, तेही वेळेवर मिळत नाही. म्हणुन दारिद्र्य रेषे खालील कुटुंबांना दरमहा 35 किलो धान्य अंत्योदय योजनेमार्फत दिले गेले पाहिजे.सन 2023 मध्ये अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांच्या पंचनामे करण्यात आले अश्या तालुक्यातील 1500 ते 2000 शेतकऱ्यांना नुकसान भरपाई त्वरीत मिळावी. मंजुराचे स्थलांतर बंद करुन त्यांना स्थानिक रोजगार उपलब्ध करुन देणे, तसेच रोजगार हमी अंतर्गत जे व्यक्तीगत कामे सुरु आहेत त्यांना अकुशल व कुशल प्रमाणे पैसे त्वरीत मिळावे आदी विविध 18 मागण्यांसाठी शहादा तालुक्यातील भुमिहीन, शेतमजुर, अल्प भूधारक व सर्व सामान्य जनतेने दि. 25 जून रोजी शहाद्याचे उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. निवेदनावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव मंडळ सदस्य नथ्थू साळवे, पक्षाचे नंदुरबार व धुळे जिल्हा सचिव मंडळ सदस्य व राज्य शेतमजूर युनियन जिल्हाध्यक्ष सुनिल गायकवाड, जिल्हा कमिटी सदस्य खंडू सामुद्रे, जिल्हा सचिव शामसिंग पाडवी, संतोष गायकवाड, राजाराम ठाकरे, मेहरबान पावरा, लखा पावरा, सुकलाल खर्डे, जिराबाई ठाकरे आदींच्या सह्या आहेत.


