आनंद कुरुडवाडे,सर्कल प्रतिनिधी रामतीर्थ
सगरोळी आदमपूर परिसरात अनेक दिवसापासून सतत विद्युत पुरवठा खंडित होऊन विजेचा लपंडाव सुरू असल्याने परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. खतगाव कॅम्प येथे असलेल्या महावितरण कंपनीच्या १३३ के. व्ही. वरून आदमपूरसह परिसरातील थडीसावळी, गळेगाव, टाकळी, अटकळी, आळंदी आदी परिसरात विद्युत पुरवठा केला जातो. तसेच सगरोळी येथे असलेल्या महावितरण कंपनीच्या ३३ के. व्ही. वरून सगरोळीसह परिसरातील बोळेगाव, शिंपाळा, अनुसयानगर, दौलतापूर, हिप्परगा आदी परिसरात विद्युत पुरवठा केला जातो. परंतु परिसरात काही दिवसापासून सारखा विजेचा लपंडाव सुरू असल्याने येथील नागरिक महावितरणच्या सततच्या होणाऱ्या लपंडावामुळे त्रस्त झाले आहेत. सगरोळी व आदमपूर परिसरात विद्युत पुरवठा सतत खंडित होऊन रात्री बे रात्री सारखी वीज जात असल्याने येथील नागरिकांना अनेकदा रात्र अंधारात काढावी लागत आहे. महावितरण कंपनीचे वरिष्ठ अधिकाऱ्यासह सर्व परिसरातील विद्युत सहाय्यक हे विद्युत पुरवठा नियमित खंडित होण्यामागचे नागरिकांना समाधानकारक कारणही सांगत नसल्याने परिसरातील विद्युत पुरवठा ही सारखी ट्रीप होत असल्याने कर्तव्यावर असणारे सर्व विद्युत सहाय्यकाच्या लक्षात कसे येत नाही? हा देखील नागरिकाच्या मनातील अनुत्तरणीय प्रश्न राहून जात आहे. परिसरात नागरिकांच्या सेवेसाठी कर्तव्यावर असणारे विद्युत सहाय्यक हे विद्युत पुरवठा सुरळीतपणे सुरू ठेवण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत का? की मान्सूनपूर्वचे महावितरण कंपनीकडून विद्युत दुरुस्तीचे काम पूर्ण झाले नाहीत का? असाही नागरिकांतून प्रश्न समोर येत आहे. विद्युत पुरवठा दिवसातून अनेक वेळा खंडित होणे हे आता नित्याचेच झाले असल्याने महावितरण कंपनीचे सर्व कर्मचारी व वरीष्ठ अधिकारी यांच्या विरोधात नागरिकात रोष निर्माण होत असल्याचे परिसरात पाहण्यास मिळत आहे. सतत होणाऱ्या विद्युत पुरवठ्यामुळे विजेवर चालणारे घरगुती उपकरणे ही जळून खाक होत असल्याने याचा आर्थिक भुर्दंड नागरिकांना सोसावा लागत आहे. त्यासाठी वरिष्ठांनी आदमपूर-कासराळी- सगरोळी परिसरावर लक्ष केंद्रित करून येथे वारंवार खंडित होणारा विद्युत पुरवठा नाहीसा करून नागरिकांना सुरळीतपणे विद्युत पुरवठा करावा, अशी परिसरातील नागरिकाकडून मागणी होत आहे.


