दिनानाथ पाटील तालुका प्रतिनिधी शहादा
शहादा, ता. 01: शहरातील जनतेची तक्रार व मागणीनुसार भंगार खरेदी-विक्री व्यवसाय व व्यावसायिकांबाबत पालिका प्रशासनाच्या वतीने कायदेशीर उपाय योजना करण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा शहादा तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्रा.मकरंद पाटील यांनी केली आहे. प्रा.मकरंद पाटील यांनी मुख्याधिकारी यांना दिलेल्या लेखी पत्राचा आशय असा, शहराची लोकसंख्या व वाढता विस्तार पाहता नगरपालिकेने जनहितासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. नागरिकांची मागणी लक्षात घेता शहराच्या विविध भागांत असलेल्या भंगार खरेदी-विक्री व्यवसाय व व्यावसायिकांबाबत पालिकेने काही बाबींची दक्षता घेणे आवश्यक आहे. यांत शहरातील भंगार खरेदी-विक्री करणाऱ्या व्यावसायिकांचे नाव, पत्ता, व्यवसाय नोंदणी व परवानगीबाबतची माहिती नगर पालिका कार्यालयात असावी. शहरातील ज्या भागात भंगार खरेदी-विक्रीची दुकाने आहेत त्या भागात सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत. सदर व्यावसायिक दुकाने रात्री उशिरापर्यंत सुरू राहत असल्याने अवैध खरेदी-विक्रीस चालना मिळते म्हणून दुकाने दिवसाच सुरू रहावी यासाठी सूचना द्यावी. शहरातील खाजगी, सार्वजनिक मालमत्ता भंगार विक्रेत्याकडे आढळल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी पालिकेचे प्रमुख म्हणून आपली राहील. तरी शहादा शहरातील भंगार खरेदी-विक्री व्यवसाय व व्यावसायिकांबाबत जनतेची तक्रार व उपरोक्त मागणी लक्षात घेऊन आपण त्वरित उपाय योजना करावी. अन्यथा मी सहकाऱ्यांसोबत कायदेशीर आंदोलन उभारू व त्याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील असे पत्रात नमूद करण्यात आले असून पत्राची लेखी प्रत तहसीलदार व पोलीस निरीक्षक शहादा यांना दिली आहे.











