राहुल दुगावकर तालुका प्रतिनिधी, बिलोली
अनेक गावची पाणीपुरवठा योजना अवलंबून असणाऱ्या लोहगाव (ता. बिलोली ) येथील पाझर तलाव ३ वर्षांपूर्वी फुटला आहे. त्याची दुरुस्ती तात्काळ व्हावी यासाठी जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाकडे येथील ग्रामपंचायतच्या वतीने सतत पाठपुरावा करूनही या बाबीकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे प्रशासकीय यंत्रणेस जागे करण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करणार असल्याची माहिती डॉ. सौ. मीनल पाटील खतगावकर यांनी दिली. लोहगाव येथे पाझर तलाव त्यास आज ४० वर्षाचा कालावधी होत आहे. या पाझर तलावाच्या पाण्यावर लोहगाव पाणी पुरवठयाची विहिर आहे. हा पाझर तलाव ३ वर्षांपूर्वीच्या अतिवृष्टीत फुटला आहे. त्यामुळे सर्व पावसाचे पाणी वाहून जात आहे. परिणामी गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीसह बाजूच्या शेतकऱ्यांच्या सर्व विहिरी आणि बोअरचे पाणी उन्हाळ्यापूर्वीच आटत असल्यामुळे पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. ३ वर्षांपूर्वी हा पाझर तलाव फुटल्यापासून येथील सरपंच यांनी या भागातील लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (तत्कालीन) व लघु पाटबंधारे विभागाच्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याकडे वेळोवेळी लेखी पाठपुरावा करूनही अद्याप पर्यंत या कामाकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नरसी ते हैदराबाद महामार्गावर डॉ. सौ. मीनलताई पाटील खतगावकर यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करु असा इशारा सरपंच, सदस्य, लोकप्रतिनिधी व गावकरी यांनी दिला.


