स्वरूप गिरमकर ग्रामीण प्रतिनिधी शिरूर
शिरूर : छत्रपती शिवराय, महात्मा बसवेश्वर, राजर्षी शाहू महाराज यांचा अखंड जयघोष, बँड, झांज पथक, धनगरी ढोलाचा गजर, लेझीम पथकाचे कलाविष्कार, फुलांनी सजवलेली पालखी, महात्मा बसवेश्वर आणि छत्रपती शिवरायांचे लक्षवेधी पुतळे, मोरपंखी रंगाच्या साड्या, गुलाबी रंगाचे तुर्रेदार फेटे परिधान केलेल्या महिलांचा अमाप उत्साह असे मंगलमय वातावरण शुक्रवारी सायंकाळी वाघोलीत पहायला मिळाले.निमित्त होते, तब्बल ८९ वर्षानंतर बसवेश्वर जयंतीनिमित्त वीरशैव लिंगायत समाजातर्फे शहरातून काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेचे. पाणी वाचवा, पर्यावरण वाचवा, लेक वाचवा, रक्तदान हेच श्रेष्ठदान असे समाज प्रबोधनपर संदेश देत निघालेल्या शोभायात्रेचे ठिकठिकाणी जल्लोषी स्वागत करण्यात आले.वीरशैव लिंगायत समाजातर्फे या वर्षी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पुणे शहर चिटणीस शिवरत्न बादगुडे यांनी जयंती उत्सवाचे आयोजन केले होते. सायंकाळी भव्य शोभा यात्रेला प्रमुख पाहुणे व्याख्यानकार किरण कोरे यांच्या हस्ते शिव-बसव पालखीचे पूजन होऊन सुरुवात झाली. शोभायात्रेत पाणी वाचवा, पर्यावरण वाचवा, रक्तदान हेच श्रेष्ठ दान, लेक वाचवा, लेक वाढवा, लेक घडवा, अशा आशयांचे विविध लक्षवेधी फलक व चित्ररथाचा समावेश होता. पारंपरिक वेशात महिलांचा सहभाग लक्षणीय ठरला. मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी आकर्षक रंगीबेरंगी रांगोळ्या रेखाटल्या होत्या. अतिशय आनंदमय वातावरणात शोभायात्रेची सांगता झाली.दरम्यान, वीरशैव लिंगायत समाजातील व्यक्तींकडून मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी पालखीच स्वागत आणि पूजन करण्यात आले. अशोक तोडकर ,शिवसांभ कोरे ,प्रदीप लोहारे, शिवा बिराजदार यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शोभायात्रा झाल्यानंतर समाजबांधवांना प्रसाद वाटप करण्यात आला.


