गजानन जिदेवार आष्टीकर तालुका प्रतिनिधी हदगाव
हदगाव : खरबी ता. हदगाव येथील एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या कारणावरून सासरच्या मंडळींनी तिचे पार्थिव तामसा प्राथमिक आरोग्य केंद्रात शवाविच्छेदनासाठी दि. ७ रोजी मंगळवारी पहाटे ४ वाजताचे दरम्यान आणले होते. पण माहेरच्या लोकांनी विवाहितेची आत्महत्या नसून, तिचा खून केल्याचा आरोप करीत नवऱ्यासह सासरच्या लोकांविरुद्ध गुन्हा नोंद होईपर्यंत शव ताब्यात घेण्यास नकार दिल्याने मंगळवारी रात्री ८ वाजेपर्यंत मयत विवाहितेचे पार्थिव तामसा प्राथमिक आरोग्य केंद्रातच होते.मयत विवाहितेचे नाव विश्रांती बालाजी डाखोरे असे आहे.मंगळवारी पहाटे विश्रांती संशयस्पदरित्या मृत अवस्थेत असल्याचे आढळले होते.सासरच्यांनी तिचे पार्थिव गळफास घेतल्याचे कारण सांगून, तामसा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. पण माहेरच्या मंडळी विश्रांतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे फेटाळत तिला मारून टाकले. गळफास घेतल्याचा बनाव नवऱ्याने केल्याचा आरोप केला. विश्रांतीच्या पार्थिवावर मंगळवारी सकाळीच आष्टी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक कदम यांनी शवविच्छेदन केले. मात्र माहेरच्या मंडळीने गुन्हा दाखल होईपर्यंत पार्थिव ताब्यात घेण्याचे टाळल्यामुळे प्रकरणाचे गांभीर्य वाढले. तामसा येथे उपविभागीय पोलीस अधिकारी डॅनियल जॉन बेन व मनाठा ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत पुणे यांनी भेट दिली. रात्री उशिरापर्यंत पार्थिव तामसा प्राथमिक आरोग्य केंद्रातच होते.मंगळवारी मनाठा ठाण्यात गुन्हा दाखला करण्यात आला असून तिन्ही आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार केदारगुडा ता. हदगाव येथील माहेर असलेल्या विश्रांती हीचा विवाह रीतिरिवाजाप्रमाणे ९ वर्षापूर्वी खरबी ता. हदगाव येथील बालाजी दत्ता डाखोरे यांच्याशी झाला होता. त्यांना संस्कार नावाचा ८ वर्षाचा मुलगा तर संस्कृती नावाची ६ वर्षाची मुलगी आहे. परंतु काही वर्षानंतर मयत विश्रांती हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करण्यात येऊन शिवीगाळ, मानसिक आणि शारीरिक त्रास देण्यात येऊ लागला. ही गोष्ट तिने माहेर कडील मंडळीला सांगितली त्यानंतर दोन्ही गावच्या प्रतिष्ठित व्यक्तींनी समजूत घालून नांदायला पाठवण्यात आले. २०२३ मध्ये तामसा जवळील वडगाव येथे प्लॉट घेण्यासाठी ५००००/- रू. मागणी करण्यात येऊ लागली. पण माहेरची परिस्थिती हालाखीची असल्याने देऊ शकले नाही. त्यानंतर यावर्षी त्यांना घरकुल मंजूर झाले होते. त्यासाठी पुन्हा ५००००/- हजार रुपये घेऊन ये नाहीतर तुला खतम करतो अशी जिवे मारण्याची धमकी दिली होती. अखेर तसेच झाले दिनांक ६ मे २०२४ रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास जबरदस्तीने विषारी औषध पाजून गळा आवळून खून करण्यात आला.मयताची आई लक्ष्मीबाई नामदेव भिसे रा. केदारगुडा यांच्या फिर्यादीवरून आरोपी बालाजी दत्ता डाखोरे (पती), शीलाबाई दत्ता डाखोरे (सासू) आणि शिवाजी राघोजी खानदोडे मुलाचा मामा यांच्याविरुद्ध मनाठा पोलिसात गु. र.न.66/2024 भादवी प्रमाणे कलम 302,498 अ, 323,504,506,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तिन्ही आरोपीला पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक उमाकांत पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बुद्धभूषण कांबळे हे करीत आहेत.


