राहुल दुगावकर,तालुका प्रतिनिधी, बिलोली
बिलोली : येथे सर्व धर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. स्थळ जुळवण्याच्या आणि प्रतिष्ठेच्या नावाखाली काहींना तर निव्वळ कर्ज काढून असा उपक्रम आटोपावा लागतो. याचबरोबर समाजामध्ये नाचक्की होऊ नये म्हणून रूढी आणि परंपरा चालू ठेवण्यात येतात सामूहिक विवाह पद्धत समाजात रूढ करण्याचा प्रयत्न केला अशातही तब्बल वीस वर्षापासून सामूहिक विवाह सोहळा ठक्करवाड परिवार आणि सामूहिक विवाह सोहळा समितीच्या वतीने दरवर्षी घेण्यात येतो. यात सगरोळी, बिलोली आणि कुंडलवाडी तसेच कासराळी येथील व्यापारी मोठ्या प्रमाणात योगदान देत असतात. यावर्षी गंगाराम ठक्करवाड यांचे दुःखद निधन ही घटना आणि निवडणुकांची धामधूम लक्षात घेता यावर्षी विवाह सोहळा संपन्न होणे कठीणच नव्हे तर अशक्य वाटत होते. मात्र अरविंद ठक्करवाड यासह बिलोली, कुंडलवाडी, कासराळी, सगरोळी येथील व्यापारासह समाजातील महत्त्वपूर्ण मंडळींनी पांयडा खंडित पडू नये म्हणून कमी वेळेत सहा विवाह जोडप्यांचा विवाह सोहळा संपन्न करण्यात यश मिळवले. यावर्षी हा विवाह सोहळा बिलोली येथील माजी नगराध्यक्ष विजयकुमार कुंचनवार यांच्या फार्म हाऊस येथे घेण्यात आला. विवाह सोहळा समितीच्यावतीने भोजन, विवाह कक्ष मनी मंगळसूत्र यासह वधू-वरांना आहेर करण्यात आले. याप्रसंगी श्री लक्ष्मणराव ठक्करवाड, विजयकुमार कुंचनवार, गोविंद मुंडकर, साईनाथ उत्तरवाड, चंद्रशेखर पाटील यांनी आपले विचार मांडले. या कार्यक्रमात वधू-वरांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले बिलोली येथील वैश्य समाजातील व्यापारी म्हणाले की, अशा कार्यक्रमात माझी केवळ उपस्थित राहणे हीच इच्छा नसून अशा कार्यक्रमात माझ्या कुटुंबातील मुलांचे विवाह संपन्न करण्याचा मानस आहे. सर्व स्तरातील सर्व क्षेत्रातील सर्व जातीतील व्यक्तींनी अशा कार्यक्रमाचे आयोजनच करणे नव्हे तर स्वतःच्या कुटुंबातील मुलांचे आणि मुलींचे विवाहाचे कार्यक्रम करणे ही खरी गरज असल्याचे बिलोली येथील प्रतिष्ठित व्यापारी यांनी व्यक्त केले. या विवाह सोहळ्यात विविध जाती आणि धर्मातील सहा जोडप्यांचा शाही पद्धतीने मोठ्या थाटामाटात विवाह संपन्न झाला. स्वतःची प्रतिष्ठा वाढविण्यासाठी लग्नाच्या कार्यक्रमात खर्च करण्याची पद्धत अनेक वर्षापासून सुरू आहे आपल्या प्रतिष्ठेसाठी वधू किंवा वर पक्षाला मोठ्या प्रमाणात याचा फटका बसतो. काही ठिकाणी दोघांनाही आर्थिक झळ मोठ्या प्रमाणात बसत असते. या कार्यक्रमासाठी विश्वनाथ अण्णा दाचावार, अशोक गरुडकर, प्रा. कमटलवार, किशोर गरुडकर यांनी विशेष परिश्रम घेतले.


