भाजपचे अध्वर्यू, माजी उपपंतप्रधान आणि राम मंदिर आंदोलनाच्या प्रमुख नायकांपैकी एक असलेले लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीपूर्वी राजकीय षटकार लगावला होता. त्यानंतर आज मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वतः अडवाणी यांच्या घरी जाऊन त्यांना भारतरत्न पुरस्कार दिला. उपराष्ट्रपती जगदीप धनखडही यावेळी उपस्थित होते. प्रकृतीच्या कारणास्तव लालकृष्ण अडवाणी शनिवारी राष्ट्रपती भवनात आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्याचा उपस्थित राहू शकले नव्हते. त्यामुळे मोदी आणि द्रौपदी मुर्मू यांनी अडवाणींच्या निवासस्थानी जाऊन त्यांना पुरस्कार प्रदान केला. पुरस्कार प्रदान करताना काढण्यात आलेल्या फोटोवरून आता टीका होऊ लागली आहे.
लालकृष्ण आडवाणी यांना पुरस्कार देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी खुर्चीवर बसले आहेत. तर, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उभ्या आहेत, असं प्रसिद्ध झालेल्या छायाचित्रांवरून स्पष्ट झालं आहे. त्यामुळे काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.


