सोहेल खानशहर प्रतिनिधी, पांढरकवडा
पांढरकवडा: स्थानिक शिवरामजी मोघे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने सर्वांना आनंद, आरोग्य, सुख व शांती मिळण्याकरिता वृक्षारोपण करून होळी साजरी करण्यात आली. होळी हा सण पौराणिक काळापासून सुरू आहे. हा सण वाईट गोष्टींना जाळून चांगल्या गोष्टींचे संरक्षण करण्याकरिता साजरा केला जातो. शहरांमध्ये तसेच खेडेगावांमध्ये अनेक ठिकाणी होळी सणानिमित्त होळ्या पेटविण्यात येतात. होळी पेटविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लाकडाचा वापर केला जातो. रात्रभर या होळीमध्ये लाकडे जाळल्या जातात. यावेळी अनेक चांगली हिरवीगार झाडे तोडली जातात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वृक्ष नाहीसे होतात व पर्यावरणाला नुकसान होते. त्यामुळे सर्वांनी अपशब्दांचे दहन करून चांगल्या गोष्टी, विचारांचे आचरण करणे व पर्यावरणाचा समतोल साधने हा संदेश देण्याकरिता विद्यार्थ्यांनी वृक्षाची पूजा करून व वृक्षरोपण करून होळी साजरी केली. यावेळेस राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. अमर वंजारी यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी वृक्ष लागवडी करिता परिश्रम घेतले.


