सुपारीला भौगोलीक मानांकन मिळवून देणार-कृषिमंत्री धनंजय मुंडे
मकरंद जाधव तालुका प्रतिनिधी श्रीवर्धन
श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर येथे पाच एकर क्षेत्रावर डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत होणाऱ्या विस्तारीत सुपारी संशोधन केंद्राचं भूमिपूजन रविवार दि.१० मार्च रोजी राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते खासदार सुनील तटकरे,महिला,बाल विकास मंत्री आदिती तटकरे,वि.प. सदस्य अनिकेत तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालं.यावेळी कृषिमंत्री धंनजय मुंडे म्हणाले की सुपारी या फळाला धार्मिक आणि सांस्कृतिक कार्याबरोबरच औषधी महत्व आहे.श्रीवर्धनची सुपारी आणि रायगड जिल्ह्यात पिकणारा कडवा वाल यांना भौगोलिक मानांकन देण्यासाठी निश्चित प्रयत्न करण्यात येतील.कोकणातील भातशेती करणारा शेतकरी मेहनतीने आणि समाधानाने शेती करीत समृद्ध होत आहे तो कधीही आत्महत्या करीत नाही. महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठांना आंतराराष्ट्रीय कंपन्यांसोबत करारबद्ध करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.कृषिमंत्री असल्याच्या आताच्या काळात कृषी विभागाने मोठी क्रांती केली असून त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वसामान्य शेतकऱ्याचीसुद्धा आर्थिक उन्नती होणार असल्याचही त्यांनी सांगितलं.धनंजय मुंडे यांच्या कारकीर्दीमध्ये दिवेआगरमधे होत असलेलं सुपारी संशोधन केंद्र हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं व्हावं हे आमचं स्वप्न असल्याचं खा. सुनील तटकरे यांनी सांगितलं.महिला, बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सुपारी तसेच रायगड जिल्हयातली फळं,फुलं, भाजीपाला,मसाला पिकं यावरील संशोधन होणार असल्याचं सांगताना या पिकांची वेगळी ओळख देशपातळीवर होणार असल्याने रायगड जिल्हयातील तसेच जवळच्या भागातील शेतकऱ्यांना त्यांचे सामाजिक व आर्थिक जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे.त्याचबरोबर या सुपारी संशोधन केंद्राचा पर्यटनाच्या वाढीसाठी देखील फायदा होईल. तर महिलांसाठी शेती उद्योगासाठी विशेष उपक्रम राबवावे जेणेकरून महिलांना शेती व्यवसायाकडे वळविता येईल व त्यातून महिला सक्षमीकरणाला हातभार लागेल असेही त्या म्हणाल्या.याप्रसंगी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू संजय भावे,संशोधन संचालक डॉ.प्रशांत शिणगारे, कुलसचिव डॉ.प्रदीप हळदवणेकर,विद्यापीठ अभियंता निनाद कुलकर्णी, उपसंचालक डॉ.अरुण माने,डॉ.राजेश धोपावकर,प्रभारी अधिकारी संशोधन केंद्र डॉ.सिद्धेश्वर सावंत, तांत्रिक सल्लागार डॉ.किरण माळशे उपअभियंता राहुल घाडगे, दिवेआगर सरपंच सिद्धेश कोसबे, विविध मान्यवर यांसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाच्या निमित्ताने कृषी विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कारानं शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला.











